रत्नागिरी : खेड तालुक्यातील लोटे येथून आपल्या लाडक्या नातीला भेटून परतत असताना विद्युत तारेच्या स्पर्शाने आजी-आजोबांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. आपल्या नातीसह मुलांसमवेतची त्यांची ती भेट अखेरची ठरली.प्रकाश घोसाळकर आणि त्यांची पत्नी वंदना घोसाळकर बोरज गावातल्या आपल्या मूळ घरी राहत होते. बोरजपासून जवळच असलेल्या लोटे गावात त्यांचे दोन मुलगे, सुना आणि नातवंड असा परिवार आहे. लोटे गावात घोसाळकरांची छोटीशी एक चाळ आहे. तीन चार दिवसांपूर्वी त्यांची नात खेळताना पडून तिला दुखापत झाली होती. आपल्या नातीला भेटायला हे आजी-आजोबा आपल्या दुचाकीवरून लोटेला गेले होते. तिला भेटून तिची विचारपूस करुन ते बोरजला पोहोचले. पण घोसाळकरवाडीमधल्या आपल्या घरी जात असताना वाटेत ३३ केव्हीची विद्युत वाहिनी तुटून पडल्याचे लक्षात आले नाही आणि नकळत या तारेला त्यांचा स्पर्श झाला. प्रकाश आणि वंदना या पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. जवळपास असलेल्या काही ग्रामस्थांच्या ही दुर्दैवी घटना लक्षात आली. पण त्यांनी प्रसंगावधान राखत , संपर्कात येणाऱ्या अनेक अडथळ्यांवर मात करत महावितरणला कळवलं आणि वीज प्रवाह खंडीत करायला लावला. सोमवारी वाऱ्याचा जोर थोडा कमी झाल्यामुळे सायंकाळी दोघं नातीला भेटायला बाहेर पडले होते. या वादळाच्या वाऱ्यांचा जोर इतका होता की , अनेक ठिकाणी वीजेचे लोखंडी खांब मोडून पडले. महावितरण प्रशासनाने सर्व विद्युतप्रवाह खंडीत केला होता. पण वीज घेऊन येणाऱ्या अशा हायव्होल्टेज विद्युत तारांचा विद्युत भार मध्येच खंडीत करण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे ही कोसळलेली तार विद्युतभारीतच राहिली. त्यातच घोसाळकरांवर काळाचा घाला घातला.
नातीची भेट ठरली अखेरची; विद्युत तारेच्या स्पर्शानं आजी आजोबांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 16:03 IST
आपल्या नातीची भेट घेऊन आजीआजोबा आपल्या घरी परतत असताना काळानं घातला घाला.
नातीची भेट ठरली अखेरची; विद्युत तारेच्या स्पर्शानं आजी आजोबांचा मृत्यू
ठळक मुद्देआपल्या नातीची भेट घेऊन आजीआजोबा आपल्या घरी परतत असताना काळानं घातला घाला.वादळामुळे विद्युत वाहिन्यांचं झालं होतं नुकसान