रत्नागिरीतील गांजा विक्रीत युवतीचा समावेश, आतापर्यंत चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 13:01 IST2023-02-20T13:01:05+5:302023-02-20T13:01:30+5:30
रॅकेट असण्याचा संशय

रत्नागिरीतील गांजा विक्रीत युवतीचा समावेश, आतापर्यंत चौघांना अटक
रत्नागिरी : शहरानजीकच्या शांतीनगर येथे गांजा विक्रीचा पर्दाफाश केल्यानंतर गांजा पुरवठ्यात एका १९ वर्षीय युवतीचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पाेलिसांनी तिच्यासह अन्य एकाला अटक केली आहे. प्रेरणा साठे (रा. मूळ रा. कारवांचीवाडी, सध्या रा. माळनाका, रत्नागिरी) व मतीन डोंगरकर (३५, मूळ रा. कोकणनगर, सध्या माळनाका) अशी त्यांची नावे आहेत. या गांजा विक्री प्रकरणात पाेलिसांनी आत्तापर्यंत चाैघांना अटक केली आहे.
ही कारवाई रत्नागिरी शहरानजीकच्या शांतीनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमाेरील रस्त्यावर गुरूवारी (१६ फेब्रुवारी) सायंकाळी ७:३० वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली हाेती. याठिकाणी गांजाची विक्री हाेणार असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी या भागात सापळा रचला हाेता.
रस्त्यावर एका रिक्षाबाबत पाेलिसांना संशय आला. त्यांनी ती थांबवून तपासणी केली. या तपासणीत आठ प्लास्टिकच्या पुरचुंडीमध्ये ५५ हजारांचे अमली पदार्थ आढळले हाेते. मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी प्रवीण परब आणि ओमकार बोरकर या दाेघांना अटक केली होती, तर त्यांची अमली पदार्थ असलेली रिक्षाही पोलिसांनी जप्त केली होती.
दोघांकडे चौकशी केल्यानंतर गांजा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती अन्य असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या माहितीत १९ वर्षीय युवती गांजा पुरवण्याचा व्यवसाय करत असल्याचे समाेर आले. पाेलिसांनी अटक केलेली प्रेरणा साठे ही मतीन डोंगरकर याच्या सोबत माळनाका येथे एका इमारतीत भाड्याचा फ्लॅट घेऊन राहत होती. तेथूनच दोघे गांजा मागवून त्याचा पुरवठा शहरातील अन्य तरुणांना करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रॅकेट असण्याचा संशय
गांजा विक्रीप्रकरणी पाेलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. एका युवतीचा यामध्ये समावेश असल्याचे समाेर येताच अन्य काेणी त्यांच्या संपर्कात आहेत का, याचा शाेध आता पाेलिस घेत आहेत. यामध्ये रॅकेट असण्याचा संशय व्यक्त हाेत असून, अन्य काही धक्कादायक बाबी उघड हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.