गॅसवाहू टँकर उलटला, मुंबई-गोवा महामार्ग १५ तास बंद; रत्नागिरीनजीकच्या हातखंबा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:39 IST2025-07-29T15:39:18+5:302025-07-29T15:39:46+5:30
गॅस गळती झाल्याने स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले

गॅसवाहू टँकर उलटला, मुंबई-गोवा महामार्ग १५ तास बंद; रत्नागिरीनजीकच्या हातखंबा येथील घटना
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एलपीजी वाहून नेणारा टँकर भरवस्तीत उलटल्याने मोठी खळबळ उडाली. महामार्गावरील वाहतूक १५ तास पूर्णपणे ठप्प झाली. या अपघातात टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. गॅस दुसऱ्या टँकरमध्ये काढून अपघातग्रस्त टँकर हटवल्यानंतर मंगळवारी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरू झाली. तोपर्यंत दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे एलपीजी भरुन हा टँकर कोल्हापूरकडे निघाला होता. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तो हातखंबा येथील एका वळणावर उलटला आणि त्यातून गॅसची गळती सुरू झाली. टँकर उलटताना मोठा आवाज झाल्याने असंख्य लोक तेथे गोळा झाले. गॅसची गळती होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने सर्वजण बाजूला झाले. दरम्यान रत्नागिरी ग्रामीण पोलिस, हातखंबा वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
सर्वात प्रथम आसपास राहणाऱ्या सुमारे १०० लोकांना महामार्गावरील एका हॉटेलमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. तोपर्यंत जिल्हा प्रशासन आणि पाेलिस प्रशासनाने गॅसची गळती रोखण्यासाठी पावले उचलली. एमआयडीसीची रेस्क्यू टीम तेथे बोलावण्यात आली. या टीमने अथक प्रयत्न करुन गॅस गळती थांबवली. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
त्यानंतर दुसरा टँकर आणून त्यात अपघातग्रस्त टँकरमधील गॅस काढून घेण्यात आला. हे दोन महत्त्वाचे टप्पे पार पडल्यानंतर अपघातग्रस्त टँकर क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही सर्व प्रक्रिया संपली. त्यानंतर सव्वादोन वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरू करण्यात आली. तोपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबवून हलक्या वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आले होते.