Ratnagiri: आई-वडील हजयात्रेवरुन आल्यावर ‘त्या’ चौघांचा दफनविधी; आरे-वारे समुद्रात बुडून झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:59 IST2025-07-21T13:59:08+5:302025-07-21T13:59:40+5:30
दाेन दिवसांत जाणार हाेते मुंबईला

Ratnagiri: आई-वडील हजयात्रेवरुन आल्यावर ‘त्या’ चौघांचा दफनविधी; आरे-वारे समुद्रात बुडून झाला मृत्यू
रत्नागिरी : शहरानजीकच्या आरे-वारे समुद्रात शनिवारी चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. चौघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. उज्मा, उमेरा, जैनब यांचे आई-वडील उमरा (हजयात्रा) करण्यासाठी सौदी अरेबिया येथे गेले आहेत. ते सोमवारी रत्नागिरीत येणार असून, त्यानंतर चौघांचा दफनविधी होणार आहे.
या दुर्घटनेत उज्मा शमशुद्दीन शेख (वय १८), उमेरा शमशुद्दीन शेख (२९), जैनब जुनेद काझी (२६), जुनैद बशीर काझी (३०) यांचा दुर्दैव्यारित्या बुडून मृत्यू झाला आहे. जुनैद काझी याचे मूळ गाव कसबा (ता. संगमेश्वर) येथे आहे. मात्र, व्यवसायासाठी ते ओसवालनगर येथे पत्नी जुनैब, दोन वर्षांचा लहान मुलगा व वयोवृद्ध आईसह राहत होते. शनिवारी सायंकाळी जुनैद, पत्नी जैनब, उज्मा, उमेरासह आरे-वारे येथे फिरायला गेले होते. समुद्रात भिजत असताना लाटेबरोबर पाण्यात ओढले गेले आणि चाैघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
उमेरा, उज्मा, जैनब यांच्या आणखी दोन बहिणी व एक भाऊ आहे. एक बहीण मुंबईत, तर दुसरी बहीण दुबईत असते तर भाऊ कतार येथे असतो. दुर्घटनेनंतर मुंबईतील बहीण रविवारी रत्नागिरीत दाखल झाली. मात्र, आई-वडील साैदीवरून कतार येथे गेले असून, कतारवरून मुलासह रविवारी सायंकाळी ८ वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर येणार आहेत. तेथून त्यांना रत्नागिरीत आणण्यात येणार आहे. साेमवारी ते आल्यानंतर चारही मृतदेहांवर कोकणनगर येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात येणार असल्याचे काझी कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी सांगितले.
दोन वर्षांचा नातू, वयोवृद्ध आजी
मृत जुनैद व जैनब यांचा दोन वर्षांचा मुलगा आहे. जुनैद यांची वयोवृद्ध आई आहे. काळाने झडप घातल्याने मुलाचा व सुनेचा मृत्यू पाहण्याची वेळ आईवर आली आहे. शिवाय दोन वर्षांच्या नातवाच्या संगोपनाची जबाबदारी आली आहे. जुनैद यांची एक बहीण ओसवालनगर येथे राहते. सून व मुलगा फिरायला गेल्याने आजी नातवाला घेऊन लेकीकडे आली होती.
दाेन दिवसांत जाणार हाेते मुंबईला
जुनैद यांचे सासू-सासरे उमरा करण्यासाठी साैदी अरेबिया येथे गेले होते. ते दि. २३ रोजी मुंबईत परतणार होते. तोपर्यंत अविवाहित मुलींना जावई जुनैद व मुलगी जैनब यांच्याकडे पाठविले होते. आई-वडील येणार असल्याने उज्मा व उमेरा दोन दिवसांत मुंबईला जाणार होत्या. त्यांचे तिकीटही काढण्यात आले होते.