पशुबळीप्रकरणी भंडारपुळेत चौघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 17:50 IST2019-10-14T17:50:11+5:302019-10-14T17:50:59+5:30
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळेपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भंडारपुळे गावातील नांदेश्वर येथे शनिवारी पशुबळीचा प्रकार उधळून लावण्यात आला. याप्रकरणी देवरुख येथील तिघांना व जाकादेवीतील एकाला अटक करण्यात आली आहे.

पशुबळीप्रकरणी भंडारपुळेत चौघे अटकेत
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळेपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भंडारपुळे गावातील नांदेश्वर येथे शनिवारी पशुबळीचा प्रकार उधळून लावण्यात आला. याप्रकरणी देवरुख येथील तिघांना व जाकादेवीतील एकाला अटक करण्यात आली आहे.
गोपीनाथ झेपले (देवरुख), संतोष पालये (धामापूर-देवरुख), विश्वनाथ धावडे (जाकादेवी), संजय किनरे (वजरे-देवरुख) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. हे चौघे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान नांदेश्वर या देवस्थानाजवळ पीकअप गाडीमधून एक रेडा घेऊन आले होते. मात्र, याचवेळी भंडारपुळे येथील दिवाकर पाटील हे आपली जनावरे आणण्यासाठी गेले असता, त्यांनी हा प्रकार पाहिला. काहीतरी संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलीसपाटील विश्वनाथ पाटील यांच्या कानावर ही गोष्ट घातली.
भंडारपुळे-गणपतीपुळे गावचे पोलीसपाटील विश्वनाथ पाटील यांना याबाबत खबर मिळताच त्यांनी लागलीच गणपतीपुळे पोलीस स्थानकाच्या स्मिता पाटील यांच्याशी संपर्क साधला व या प्रकाराची सर्व माहिती दिली. विश्वनाथ पाटील यांच्याकडून माहिती मिळताच स्मिता पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश गावीत, पोलीस कॉन्स्टेबल मधुकर सलगार, प्रशांत गोवळकर हे घटनास्थळी दाखल झाले.
पशुबळीची वार्ता हा-हा म्हणता सर्वत्र पसरली आणि नांदेश्वर देवस्थानपासून ते अगदी पोलीस स्थानकापर्यंत ग्रामस्थांनी गर्दी केली होती. याप्रकरणी प्राण्यांवर अत्याचार केल्याप्रकरणी जयगड पोलीस ठाणे यांच्याकडे गु. र. नं. ३४/२०१९ व १९६० चे कलम ११ (१) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ व मो. पा. का. कलम ३०/१७७/सी ३/१७७ भा. दं. वि. स. कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.