मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पाच वाहनांचा अपघात, २० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 16:30 IST2024-12-04T16:25:40+5:302024-12-04T16:30:03+5:30

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मंगळवारी दुपारी २:३० वाजता पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. एकाच ठिकाणी पाच वाहने ...

Five vehicles accident at Parashuram Ghat on Mumbai Goa highway 20 injured | मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पाच वाहनांचा अपघात, २० जखमी

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पाच वाहनांचा अपघात, २० जखमी

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मंगळवारी दुपारी २:३० वाजता पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. एकाच ठिकाणी पाच वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात घरडा कंपनीच्या बसचा समावेश असून, या बसमधील २० कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. घाटात दोन तास वाहतूक बंद झाली होती. हा अपघात भीषण असला तरी सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी आतापर्यंत चारवेळा अपघात झाला आहे.

परशुराम घाटात ज्या ठिकाणी संरक्षक भिंत कोसळली आहे, त्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. मंगळवारी दुपारी २:३० वाजता चिपळुणातून लोटे औद्योगिक वसाहतीकडे निघालेल्या घरडा कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या बसला मुंबईहून आलेल्या कंटेनरची समोरासमोर धडक बसली. यामध्ये बसला जोरदार दणका बसला. याचवेळी कंटेनर बाजूला असलेल्या आयशर टेम्पोवर उलटला.

घरडा कंपनीच्या बसच्या मागे एक कार आणि त्या मागे एक ट्रक होता. बसच्या मागे असणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्याने घरडा कंपनीच्या बसमधील वीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. खासगी बस आणि कंटेनर यांच्यातील अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूने पूर्णतः ठप्प झाली होती. चिपळूण पोलिसांच्या प्रयत्नातून सुमारे दोन ते अडीच तासाने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी पाहणी करून महामार्ग मोकळा करून घेण्यासाठी मदत केली.

खबरदारीअभावी अपघात

या घाटात या ठिकाणी अपघात होण्याची ही चौथी घटना आहे. या ठिकाणी अपघाताच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर याच ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Five vehicles accident at Parashuram Ghat on Mumbai Goa highway 20 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.