पहिली रो-रो सेवा आजपासून कोलाड येथून सुरू होणार, नोंदणीची अंतिम मुदत वाढवण्यात आली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 15:33 IST2025-08-23T15:32:26+5:302025-08-23T15:33:14+5:30
कोकण रेल्वेने आपली अधिकृत वेबसाइटवर संपूर्ण माहिती, नियम व अटी उपलब्ध करून दिले

पहिली रो-रो सेवा आजपासून कोलाड येथून सुरू होणार, नोंदणीची अंतिम मुदत वाढवण्यात आली
रत्नागिरी : गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी कोकण रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवासी आणि वाहनचालकांच्या मागणीचा विचार करून रोल-ऑन/रोल-ऑफ (रो-रो) कार वाहतूक सेवेच्या नोंदणीची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. पहिली रो-रो सेवा शनिवारी (दि. २३) कोलाड येथून सुरू होणार आहे.
या सेवेसाठीची नोंदणीची अंतिम मुदत २२ ऑगस्टपर्यंत होती. तसेच दि. २४ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत नियोजित सर्व रो-रो फेरींसाठी प्रवासाच्या तारखेच्या तीन दिवस आधीपर्यंत (प्रवासाची तारीख वगळून) सायंकाळपर्यंत नोंदणी करता येईल. उदाहरणार्थ, १ सप्टेंबरच्या फेरीसाठी २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
जर एखाद्या प्रवासासाठी आवश्यक इतकी नोंदणी झाली नाही, तर ती फेरी रद्द केली जाईल. मात्र, आधीच नोंदणी केलेल्या ग्राहकांना तत्काळ कळवले जाईल आणि त्यांचे शुल्क पूर्णपणे परत केले जाईल, असे कोकण रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवाशांना या सेवेत सहज नोंदणी करता यावी, यासाठी कोकण रेल्वेने आपली अधिकृत वेबसाइट www.konkanrailway.com यावर संपूर्ण माहिती, नियम व अटी उपलब्ध करून दिले आहेत.