गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
By अरुण आडिवरेकर | Updated: August 24, 2025 09:16 IST2025-08-24T09:03:08+5:302025-08-24T09:16:56+5:30
Ratnagiri Bus Fire: रत्नागिरीच्या कशेडी बोगद्याजवळ खासगी बसला अचानक आग लागली.

गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
खेड : मुंबईहून मालवणच्या दिशेने गणेशभक्तांना घेऊन जाणाऱ्या एका आराम बसला अचानक आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री २:१० वाजता खेड तालुक्यातील कशेडी बोगद्यानजिकच्या सुरुवातीला असणाऱ्या पुलावर घडली. गाडीचा टायर फुटल्याने ही आग लागल्याचे प्रवाशांनी सांगितले. या घटनेनंतर क्षणातच ज्वाळांनी संपूर्ण बसला वेढा घातला आणि आगीचा भडका उडाला. चालकाने प्रसंगावधानता राखून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या दुर्घटनेनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या दुर्घटनेत जमेची ०२, एफजी २१२१ या क्रमांकाची खासगी आराम बस पूर्णपणे जळून खाक झाली असून प्रवाशांचे साहित्य देखील आगीत भस्मसात झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती पोलिस घेत आहेत.
आग लागल्याची माहिती मिळताच खेड नगरपरिषदच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फायरमन शाम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहनचालक गजानन जाधव तसेच सहायक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ आणि सुरज शिगवण यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप असून, सामान मात्र पूर्णतः जळून खाक झाले.