रत्नागिरीतील भाट्ये येथील बोट बांधणीच्या कारखान्यात आग, बोटीसह गाडी जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 18:05 IST2025-06-23T18:04:55+5:302025-06-23T18:05:07+5:30

सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही

Fire breaks out at boat building factory in Bhatye Ratnagiri, boat and car gutted | रत्नागिरीतील भाट्ये येथील बोट बांधणीच्या कारखान्यात आग, बोटीसह गाडी जळून खाक

रत्नागिरीतील भाट्ये येथील बोट बांधणीच्या कारखान्यात आग, बोटीसह गाडी जळून खाक

रत्नागिरी : शहरानजीक भाट्ये येथील बोट बांधणीच्या कारखान्यात अचानक लागलेल्या आगीत मासेमारी बोट आणि चारचाकी गाडी जळून खाक झाली. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत बोट मालक आसिफ जावेद वस्ता (रा. राजीवडा, रत्नागिरी) यांचे सुमारे पाच ते सात लाखांचे नुकसान झाले आहे.

पावसामुळे मासेमारी हंगाम बंद असल्याने बाेटींची दुरुस्ती करण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास भाट्ये समुद्रकिनारी आसिफ वस्ता डागडुजीचे काम करत होते. गॅस वेल्डिंग मशिनच्या सहाय्याने काम सुरू असताना अचानक बोटीने पेट घेतला. सुरुवातीला किरकोळ स्वरूपात असलेल्या आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केले. या आगीत बोटीच्या बाजूला रसायनाने भरलेली चारचाकी गाडी उभी होती. या गाडीनेही पेट घेतला. अवघ्या काही क्षणात बोटीला व गाडीला आगीच्या ज्वाळांनी वेढले.

बोटीला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. भाट्ये तपासणी नाक्यावरील पोलिस कर्मचारी रोहन गमरे आणि विजय आंब्रे हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शहर पोलिस स्थानक आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला माहिती दिली. तसेच मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली. या आगीत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. मात्र, आगीत बोट आणि चारचाकी गाडी पूर्णतः जळून खाक झाली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडून दुर्घटनाग्रस्त बोटीचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

दुर्घटनेवेळी बोटीच्या डागडुजीचे काम सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, गॅस वेल्डिंग मशिनच्या सहाय्याने काम सुरू असताना शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: Fire breaks out at boat building factory in Bhatye Ratnagiri, boat and car gutted