नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी समर्थकांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 14:34 IST2020-10-05T14:33:48+5:302020-10-05T14:34:45+5:30
Nanar refinery project, ratnagiri news इथल्या बेरोजगारीचा प्रश्न कायमचा सोडवायचा असेल, राजापूर बाजारपेठेला पुन्हा ऊर्जितावस्था आणायची असेल तर आपल्या दाराशी आलेला रिफायनरी प्रकल्प हातचा जाऊ द्यायचा नाही, असा वज्रनिर्धार सर्वपक्षीय नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ बैठकीत करण्यात आला.

नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी समर्थकांचा एल्गार
राजापूर : इथल्या बेरोजगारीचा प्रश्न कायमचा सोडवायचा असेल, राजापूर बाजारपेठेला पुन्हा ऊर्जितावस्था आणायची असेल तर आपल्या दाराशी आलेला रिफायनरी प्रकल्प हातचा जाऊ द्यायचा नाही, असा वज्रनिर्धार सर्वपक्षीय नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ बैठकीत करण्यात आला.
येथील राजापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली राजापुरात रविवारी सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेकर, सचिव अविनाश महाजन, भाजप तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आबा आडिवरेकर, नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, ज्येष्ठ व्यापारी मजीद पन्हळेकर, शिवसेनेचे राजा काजवे, भाजपचे वसंत पाटील, व्यापारी संघाचे दीनानाथ कोळवणकर उपस्थित होते.
अविनाश महाजन यांनी प्रास्ताविक केले. नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी हा प्रकल्प तालुक्यात होणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. अभिजीत गुरव यांनी हा प्रकल्प ज्या भागात होत आहे. त्या सर्व ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन प्रकल्प समर्थनार्थ उभे राहिले पाहिजे, असे सांगितले.
हनिफ काझी यांनी जे सनदशीर मार्गाने मागून मिळत नाही ते संघर्षातून मिळविण्याची तयारी ठेवली पाहिजे, अशी रोखठोक भूमिका मांडली. नाणार प्रकल्पासंदर्भात आता सर्वांनी मिळून निर्णायक भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे शशिकांत सुतार यांनी सांगितले. सूत्रसंचालन नीलेश पाटणकर यांनी केले.
समर्थनार्थ एल्गार
प्रकल्पाबाबतची वस्तुस्थिती जाणून न घेता प्रकल्पाला होणारा विरोध हा राजकीय आहे. तो तालुक्याच्या भवितव्याला हानिकारक आहे. हे सत्य शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रकल्प समर्थनार्थ एल्गार करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.