Ratnagiri: गुढे येथे गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 13:58 IST2025-09-27T13:58:02+5:302025-09-27T13:58:52+5:30
बिबट्याचा हल्ला?

Ratnagiri: गुढे येथे गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू
चिपळूण : गव्याच्या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना चिपळूण तालुक्यातील गुढे येथे शुक्रवारी दुपारी घडली. गुढे जोगळेवाडी येथील रवींद्र आग्रे (वय ६०, रा. गुढे - जाेगळेवाडी, चिपळूण) असे त्यांचे नाव आहे.
आंग्रे हे गुढे येथील रस्त्यावरून निघाले असतानाच अचानक गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. ते बराच वेळ रस्त्यावर पडून होते. या रास्त्यावरून कोणाची ये-जा न झाल्याने ते तसेच पडून राहिले. त्याठिकाणी जाणाऱ्या काही ग्रामस्थांनी त्यांना पाहिले असता त्यांनी तत्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री कामथे येतील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू होते.
वडापचा व्यवसाय
रवींद्र आग्रे हे गावातच वडापचा व्यवसाय करतात. तसेच त्यांची गावातच काजूची फॅक्टरीही आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा एकत्रित परिवार आहे.
बिबट्याचा हल्ला?
गुढे परिसरात सकाळी ग्रामस्थांना बिबट्या दिसला हाेता. ग्रामस्थांनी त्याला पिटाळून लावले हाेते. त्यामुळे हा हल्ला गव्याने केलेला नसून बिबट्याने केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी बाजूच्याच कळंबट गावातील एका तरुणावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे याच बिबट्याने हल्ला केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.