मुंबई-गोवा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार, वृद्ध दाम्पत्य बालंबाल बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:20 IST2025-01-20T13:20:16+5:302025-01-20T13:20:38+5:30
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी-कोकजेवठार (ता. रत्नागिरी ) येथे कारने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली. गाडीतून धूर ...

मुंबई-गोवा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार, वृद्ध दाम्पत्य बालंबाल बचावले
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी-कोकजेवठार (ता. रत्नागिरी) येथे कारने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली. गाडीतून धूर येत असल्याचे लक्षात येताच गाडीतील वृद्ध दाम्पत्याला बाहेर काढल्याने माेठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेत कार पूर्ण जळून २५ हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.
याबाबत विश्वनाथ गंगाराम पवार (७४, रा. हुनमाननगर, विलेपार्ले, मुंबई) यांनी पाेलिस स्थानकात माहिती दिली. त्यानुसार, रविवारी ते पत्नी वंदना पवार आणि आपल्या चालकासह कार (एमएच ०२, व्हीटी ४६३३) मधून मुंबई ते ओणी असा प्रवास करत होते. दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास ते महामार्गावरील निवळी-कोकजेवठार येथे आले असता, त्यांच्या कारमधून अचानक धूर येऊ लागला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने पवार दाम्पत्याला कारमधून बाहेर काढले. त्यानंतर काही क्षणातच कारने पेट घेतला.
ही बाब आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामीण पोलिस, अग्निशमन दल आणि हातखंबा वाहतूक पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच घटनास्थळी दाखल हाेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कार रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेडकाॅन्स्टेबल रुपेश भिसे करत आहेत.