कोकणात पर्यावरणपूरकच प्रकल्प - उपमुख्यमंत्री अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 17:12 IST2025-03-18T17:11:42+5:302025-03-18T17:12:01+5:30
रत्नागिरीत १९७ कोटींचे कौशल्यवर्धन केंद्र

कोकणात पर्यावरणपूरकच प्रकल्प - उपमुख्यमंत्री अजित पवार
रत्नागिरी : उद्योगांना बळकटी देणाऱ्या योजना अर्थसंकल्पात जाहीर केल्या आहेत. राज्यात, जिल्ह्यात जे प्रकल्प होत आहेत अशा प्रकल्पांना राज्य सरकारकडून निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही असे ठामपणे सांगितले.
सध्याचे युग तंत्रज्ञानाचे युग असून, त्यामध्ये बदल होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:ला घडवताना तांत्रिक व व्यवसाय प्रशिक्षण घेणे काळाची गरज आहे. या संकल्पनेतूनच काैशल्यवर्धक केंद्राची रत्नागिरीत उभारणी केली जात आहे. चंद्रपूर, गडचिरोली व त्यानंतर रत्नागिरी शहरात हे केंद्र सुरू होणार आहे. याचे श्रेय पालकमंत्री उदय सामंत यांना आहे. सध्या कुशल मनुष्यबळाची गरज असून, ही गरज काैशल्यवर्धन केंद्रामुळे पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
टाटा उद्योग समूह व एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी शहरातील चंपक मैदान येथे टाटा संचलित काैशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनानंतर आयाेजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनजंय कुलकर्णी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, टाटा उद्योग समुहाचे कुणाल खेमनार, अनिल केलापुरे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, रत्नागिरी शहरात १९७ कोटींचे काैशल्यवर्धन केंद्र उभारत असून, लवकरात लवकर ते पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे शहर व आसपासच्या तालुक्यांत सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना फायदा होणार आहे. अत्याधुनिक प्रशिक्षणामुळे राेजगार, नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. अभियांत्रिकी, रासायनिक, फळप्रक्रिया उद्योगांना मनुष्यबळाची उपलब्धता होईल, असेही ते म्हणाले.
मंत्री सामंत म्हणाले की, काैशल्यवर्धन केंद्रामुळे रत्नागिरीतील विद्यार्थी रत्नागिरीतच शिकून रोजगार किंवा व्यावसायिक व्हावा, अशी अपेक्षा आहे. हे केंद्र वर्षभरात विद्यार्थ्यांसाठी खुले करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
खासदार सुनील तटकरे यांनी काैशल्यवर्धक केंद्रामुळे रत्नागिरी शहर राज्यातच नव्हे तर देशातही महत्त्वाचं शहर म्हणून ओळखलं जाईल, असे सांगितले. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी या काैशल्य केंद्रामुळे चांगल्या दर्जाच्या नोकरीची, व्यवसायाची संधी प्राप्त होणार असल्याचे सांगितले.
महामार्गाच्या कामासाठी पाठपुरावा
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत पाठपुरावा करून लवकरात लवकर ताे पूर्ण करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच विमान, जल, रस्ते विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.