रत्नागिरीत मद्यधुंद तरुणाचा दुचाकीस्वारावर हत्याराने वार, जखमीवर उपचार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:51 IST2025-11-11T11:50:36+5:302025-11-11T11:51:02+5:30
मद्यधुंद तरुणाला ताब्यात घेतले

रत्नागिरीत मद्यधुंद तरुणाचा दुचाकीस्वारावर हत्याराने वार, जखमीवर उपचार सुरु
रत्नागिरी : एका मद्यधुंद तरुणाने धारदार हत्याराने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणावर वार केल्याची घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमाराला शहरातील मांडवी भूते नाका येथे घडली. या हल्ल्यात अरमान इनामदार (वय २९, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) हा तरुण जखमी झाला असून, त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
अरमान इनामदार साेमवारी रात्री आपल्या घरी जात असताना मांडवी भूते नाका येथे अंकुश मांडवकर या तरुणाने त्याला रस्त्यात मध्येच थांबून त्याच्या डोक्यावर व तोंडावर हत्याराने वार केले यात तो तरुण गंभीर जखमी झाला आहे.
या तरुणाने बराच वेळ धिंगाणा घातला होता. स्थानिक नागरिकांचा आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यावरही तो धावून गेला. एका गाडीचीही काच फोडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रत्नागिरी शहरचे पोलिस निरीक्षक विवेक पाटील, उपविभागीय अधिकारी नीलेश माईंनकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मद्यधुंद तरुणाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरू होते.
रुग्णालयात गर्दी
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरकरवाडा येथील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. अरमान याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जमावाला उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईंनकर यांनी उपचाराची माहिती दिली. त्यानंतर जमाव पुन्हा मिरकरवाडा येथे गेला.