रत्नागिरी जिल्ह्यात तरुण मतदारांमध्ये घट; टक्केवारी ३४ च्या खाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 18:21 IST2025-11-21T18:21:01+5:302025-11-21T18:21:43+5:30
Local Body Election: रत्नागिरी, राजापूर, गुहागर राज्यात बाॅटम २० मध्ये; शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित स्थलांतर वाढल्याने परिणाम

संग्रहित छाया
रत्नागिरी : राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील १८ ते ३५ या वयोगटातील तरुण मतदारांच्या संख्येची आकडेवारी राष्ट्रीय निर्देशांकानुसार काढण्यात आली आहे. त्यानुसार टक्केवारी अधिक आणि कमी असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदार यांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात रत्नागिरी नगर परिषद, राजापूर नगर परिषद आणि गुहागर नगर पंचायतीत टक्केवारी ३४ टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे निदर्शनात आले आहे.
या आकडेवारीचा आधार घेता महाराष्ट्रातील २० नगर परिषदा आणि नगर पंचायती प्रथम २० मध्ये आहेत. यात नांदेड, संभाजीनगर, परभणी, अकोला, जालना, लातूर, अहिल्यानगर, नाशिक, वाशीम, जळगाव, आदी जिल्ह्यांमधील काही स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे. यात १८ ते ३५ या वयोगटातील तरुण मतदारांची आकडेवारी एकूण मतदारांच्या ४३.९० टक्के ते ४७. ६६ टक्के या दरम्यान आहे.
तर टक्केवारी कमी असलेल्या २० स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह रायगड, वर्धा, सातारा, यवतमाळ या जिल्ह्यांमधील काही नगर परिषदा, नगर पंचायती आहेत. यांची टक्केवारी २७.८६ ते ३३.५१ टक्के एवढी कमी आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा एकंदरीत विचार करता १८ ते ३५ या वयोगटातील तरुण-तरुणी शिक्षण आणि नोकरी - व्यवसायानिमित्त मोठ्या संख्येने मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे या वयोगटातील मतदारांची टक्केवारी रत्नागिरी आणि राजापूर नगर परिषद तसेच गुहागर नगर पंचायतीच्या क्षेत्रात कमी झाल्याचे दिसते.
१८ ते ३५ वयोगटातील मतदारांची टक्केवारी
- रत्नागिरी नगर परिषद ३१.४३ टक्के
- राजापूर नगर परिषद ३३.५१
- गुहागर नगर पंचायत ३२.२१
रत्नागिरी नगर परिषदेच्या क्षेत्रातील १८ ते २८ वयोगटातील मतदारांचीही टक्केवारी एकूण मतदारांच्या केवळ १७.६६ टक्के इतकी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सात स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी गुहागर नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये १८ वयोगटातील एकही मतदार नाही. रत्नागिरीसह अमरावती, गोंदिया, सातारा या जिल्ह्यांमधील काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही १८ वर्षांचा एकही मतदार नाही.