दाभोळेतील पंचायत समिती सदस्या शिवसेनेत डेरेदाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2016 00:37 IST2016-03-07T23:30:34+5:302016-03-08T00:37:31+5:30
राष्ट्रवादीला धक्का : पंचायत समितीत आता केवळ दोन सदस्य

दाभोळेतील पंचायत समिती सदस्या शिवसेनेत डेरेदाखल
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे पंचायत समिती गणाच्या राष्ट्रवादीच्या सदस्या दीक्षा मालप यांनी आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने सेनेचे संख्याबळ वाढले असून, राष्ट्रवादीत पळापळ उडाली आहे.
संगमेश्वर पंचायत समितीमध्ये सध्या शिवसेना ९, राष्ट्रवादी ३, भाजप १ व बहुजन विकास आघाडी १ असे पक्षीय बलाबल असून, तालुक्यातील संघटना अधिक भक्कम करण्याहेतूने आमदार राजन साळवी यांनी राजकारणातील मुत्सद्देगिरीचे तंत्र अवलंबत दाभोळे गणाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या दीक्षा मालप याच्या शिवसेना प्रवेशासाठी प्रयत्न केले. आमदार साळवींच्या प्रयत्नांना जिल्हा नियोजन समिती सदस्य जया माने व जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती विलास चाळके यांची जोड मिळाली.
अखेर दाभोळे सुकमवाडी येथे नूतन सभापतींंच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी दीक्षा मालप यांनी आमदान राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने पंचायत समितीमधील सेनेचे संख्याबळ १०वर गेले असून, राष्ट्रवादीचे संख्याबळ १ने कमी होऊन राष्ट्रवादीचे फक्त २ सदस्य पंचायत समितीत राहिले आहेत.
दीक्षा मालप यांच्या शिवसेना प्रवेशाने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलताना आमदार राजन साळवी यांच्या विधानसभा मतदारसंघात येणारा दाभोळे हा जिल्हा परिषद गट अधिक भक्कम झाला आहे. आमदार साळवी यांनी शिवबंधन बांधून मालप यांचे सेनेत स्वागत
केले. यावेळी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रप्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य जया माने, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती विलास चाळके, जिल्हा परिषद माजी सदस्या रजनी चिंगळे, विभागप्रमुख सदा कांबळे, मनोहर सुकम, अजित भोसले, कृष्णा सकपाळ, नारायण सिनकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राजकीय खेळी : गटात वर्चस्व वाढणार
शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी भविष्यासाठी राजकीय खेळी खेळली आहे. दाभोळे जिल्हा परिषद गटावर पकड राखण्यासाठी पर्यायाने विधानसभा मतदारसंघात आपले प्राबल्य वाढवण्यासाठी साळवी यांनी आतापासूनच पावले उचलली असल्याचे यावरून दिसून येत
आहे.