The cyclone will hit the coast of Maharashtra in June after 129 years | महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर १२९ वर्षांनंतर जूनमध्ये धडकणार चक्रीवादळ

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर १२९ वर्षांनंतर जूनमध्ये धडकणार चक्रीवादळ

ठळक मुद्देअरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा भारतीय हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी : अम्फान वादळानंतर आता दुसरं ‘निसर्ग’ हे चक्रीवादळ समुद्रकिनाऱ्यावर धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या काही दिवसांत उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या दक्षिणेला त्याचा फटका बसू शकतो. हे चक्रीवादळ ३ जूनच्या संध्याकाळी किंवा रात्री पश्चिम किनारपट्टीजवळून पुढे सरकण्याचा अंदाज सध्या व्यक्त करण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळामध्ये बदलला तर जून महिन्यात महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात १२९ वर्षांनंतर हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीवर निर्माण होऊन धडकण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रामध्ये १८९१ मध्ये पहिल्यांदा अरबी समुद्रामध्ये किनारपट्टीजवळ समुद्री वादळाची स्थिती निर्माण झाली होती. तर १९४८, १९८० साली अशाप्रकारे समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले होते. तुफान येईल अशी स्थितीदेखील निर्माण झाली होती. मात्र, कालांतराने ती विरून गेली. दरम्यान, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा हा वादळामध्ये बदलला गेला तर त्याचं नावं ‘निसर्ग’ असं ठेवलं जाईल. अद्याप त्याचं नामकरण करण्यात आलेलं नाही. जर कमी दाबाचा पट्टा सायक्लॉनिक वादळामध्ये बदला तरच त्याचं नामकरण करण्याची पद्धत आहे.

हवामान खात्याने सध्याची स्थिती पाहता महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात मच्छिमारांना समुद्रामध्ये पुढील काही दिवस न जाण्याचा सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या ९० ते १०० किलोमीटर प्रतितास या वेगाने वारा वाहत आहे. भविष्यात हा वेग ११० होण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे.

 

Web Title: The cyclone will hit the coast of Maharashtra in June after 129 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.