Ratnagiri: वाशिष्टी नदीत उडी घेत दाम्पत्याने संपविले जीवन, शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:38 IST2025-07-30T14:38:41+5:302025-07-30T14:38:52+5:30
दोघेही धुळे येथील असल्याची माहिती

Ratnagiri: वाशिष्टी नदीत उडी घेत दाम्पत्याने संपविले जीवन, शोध सुरू
चिपळूण : येथील वाशिष्टी नदीमध्ये उडी घेत तरुण दांपत्याने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार आज, बुधवारी (दि,३०) घडला आहे. या दोघांचा शोध एनडीआरएफ चे पथक घेत आहे. हे दोघेही धुळे येथील असल्याची माहिती पुढे येत आहे.
चिपळूण रेल्वे स्थानकानजीक एका पुलावरून एका तरुण महिलेने नदीत उडी मारण्याचे काही लोकांनी पाहिले. त्यांनी तातडीने ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे इंडीआरएफच्या पथकाने तेथे तत्काळ धाव घेतली. दरम्यान पुलावर एक मोटरसायकल उभी असल्याचे लोकांच्या लक्षात आले.
त्यामुळे त्या महिलेच्या आधी तिच्या पतीने उडी मारली असावी, असा अंदाज लावला आहे. त्या पुरुषाला उडी मारताना कोणीही पाहिले नसल्याने काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र त्या महिलेच्या पतीनेही नदीत उडी मारली असल्याचा तर्क लावला जात आहे. एन डी आर एफ चे पथक या दोघांचा शोध घेत आहे.
गेल्या काही दिवसात वाढलेल्या पावसामुळे वाशिष्ठीचे पाणीही वाढले आहे. त्यामुळे शोध घेण्यात अडचण येत आहे. पोलिस या दोघांबाबत अधिक माहिती घेण्याचे कसोशीने प्रयत्न करत आहेत. मोटरसायकलमुळे हे दांपत्य धुळे येथील असल्याचा अंदाज लावला जात आहे.