‘दापोली फंड’मध्ये घोटाळा असल्याची पोलिसांकडे तक्रार; एका महामंडळातील कर्मचाऱ्यांकडे प्राथमिक चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 19:14 IST2025-10-24T19:13:14+5:302025-10-24T19:14:09+5:30
दरमहा एक हजार ते पाच हजार रुपये इतकी रक्कम गोळा करत आहेत

‘दापोली फंड’मध्ये घोटाळा असल्याची पोलिसांकडे तक्रार; एका महामंडळातील कर्मचाऱ्यांकडे प्राथमिक चौकशी सुरू
दापोली : शहरात ‘दापोली फंड’ या नावाने सुरू असलेल्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. सार्वजनिक महामंडळातील काही कर्मचारी आणि महिला कर्मचारी या अवैध फंडात सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूज्ञ नागरिकांनी याबाबत दापोलीचे पोलिस उपअधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, दिवाळीच्या आधीपासून पोलिसांनी काही कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
शहरातील काही कर्मचारी ‘दापोली फंड’ या नावाने अनेक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून, त्यातून दरमहा एक हजार ते पाच हजार रुपये इतकी रक्कम गोळा करत आहेत. हे सर्व व्यवहार रोख स्वरूपात स्वरूपात करण्यात येत असून, काही कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा आहे. दिवाळीच्या आठवडाभर आधी हा फंड फोडला जातो आणि गुंतवणूकदारांना ‘गिफ्ट’ व हप्त्यांच्या स्वरूपात परतावे दिले जातात.
या फंडाचा मुख्य सूत्रधार म्हणून स्थानिक कर्मचाऱ्याचे नाव तक्रारीत नमूद असून, त्याने या फंडातून कमावलेल्या पैशातून मालमत्ता विकत घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या व्यवहारांना काही अधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. यापूर्वी या संदर्भात अंतर्गत तक्रार झाली होती. मात्र, ती दडपली गेल्याची चर्चा आहे.
या फंडामुळे शहरात अनेकदा वाद, गोंधळ आणि हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. ‘दापोली फंड’ प्रकार चिपळूणमधील ‘टीडब्ल्यूजे’ घोटाळ्याच्या धर्तीवरच चालू असून, यात सामान्य नागरिकांसह महामंडळ कर्मचाऱ्यांचेही लाखो रुपये अडकले असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून, काही महिला कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.