मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
By मनोज मुळ्ये | Updated: June 8, 2025 11:29 IST2025-06-08T10:33:09+5:302025-06-08T11:29:32+5:30
मुंबई गोवा महामार्गावर गॅस टँकर आणि मिनी बसचा मोठा अपघात झाला असून परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर बावनदी (ता. रत्नागिरी) येथे सीएनजी वाहून नेणारा टँकर आणि एका खासगी ट्रॅव्हल्सचा (वडाप) अपघात होऊन टँकरमधील सीएनजीची गळती झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. गळती झालेला सीएनजी हवेत पसरला आणि त्यात लागलेली आग एका घरापर्यंत पोहोचली. या दुर्घटनेत आगीमुळे एक म्हैस भाजली असून, घराजवळची रिक्षा आणि दोन दुचाकींचे नुकसान झाले आहे.
अपघातग्रस्त खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना दुखापत झाली असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात घालवण्यात आले आहे. टँकर मधील उरला सुरला सीएनजी काढून घेण्यासाठी आत्ता वाहतूक थांबवण्यात आली आहे.
अपघातग्रस्त टँकर मुंबईच्या दिशेने जात होता तर खासगी ट्रॅव्हल्स चिपळूणहून रत्नागिरीला येत होती. बावनादी येथे टँकरची खासगी ट्रॅव्हल्सला धडक बसली. ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्ता सोडून वीस फूट खाली गेली. त्यात ट्रॅव्हल्समधून प्रवास करणारे सर्वच प्रवासी जखमी झाले आहेत.
या अपघातामुळे टँकरची सीएनजी भरलेली टाकी रस्त्याच्या कडेला गटारानजीक पडली आणि त्यातून सीएनजीची गळती मोठ्या प्रमाणात सुरू झाली. सीएनजी झपाट्याने आसपास पसरला. त्यामुळे त्या परिसरातील लोकांमध्ये खळबळ उडाली. मोठी धावाधाव सुरू झाली.
मुंबई गोवा महामार्गांवर एलपीजी टँकर अपघात, गॅस गळतीनंतर घराने घेतला पेट#MumbaiGoaHighway#Ratnagiri#Accidentpic.twitter.com/dCvthXINn0
— Lokmat (@lokmat) June 8, 2025
हवेत पसरलेला सीएनजी अचानक पेटला आणि त्या आगीची झळ तेथील एका घराला बसली. त्यात त्या घरातील म्हैस जखमी झाली आहे आणि रिक्षा व दोन दुचाकींचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील सर्व माणसांनी बाहेर पळ काढल्यामुळे त्यांना दुखापत झाली नाही.
पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक पोलीसही अपघातग्रस्त ठिकाणी पोहोचले. त्यांनी जखमींना बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात पाठवले. टँकरमधील बहुतांश सीएनजीची गळती झाली आहे. मात्र त्याच्या कप्प्यातील शिल्लक राहिलेला सीएनजी काढण्याचे काम पावणे नऊच्या सुमारास सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूला थांबवून ठेवण्यात आली आहे .
दरम्यान, अपघात ग्रस्त खासगी ट्रॅव्हल्समधून १६ शिक्षक प्रवास करत होते. ते रत्नागिरीत एका प्रशिक्षणासाठी येत होते. या अपघातात ते सर्वजण जखमी झाले आहेत.