खारेपाटण येथे कडकडीत बंद

By Admin | Updated: August 24, 2015 23:25 IST2015-08-24T23:25:21+5:302015-08-24T23:25:39+5:30

मारहाण प्रकरण : व्यापारी असोसिएशन, रिक्षा संघटना व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

Clutter closes at Kharapatan | खारेपाटण येथे कडकडीत बंद

खारेपाटण येथे कडकडीत बंद

खारेपाटण : खारेपाटण ग्रामस्थ व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी प्रमोद कांबळे, त्यांचे सहकारी यांच्यात झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिसांनी दडपशाहीने ग्रामस्थांची तक्रार न घेता कारवाई केली. अटक केलेल्या ग्रामस्थांवर चुकीची कलमे लावून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरविले. याच्या निषेधार्थ खारेपाटण व्यापारी असोसिएशनने सोमवारी पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद लाभला.
खारेपाटणमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्यावतीने सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त बाजारपेठ, बसस्थानक परिसरात लावण्यात आला होता. खारेपाटण बंदच्या पार्श्वभूमीवर विष्णू मंदिर येथे एकत्र येऊन बैठक घेण्यात आली. यामध्ये कणकवली पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना संबंधित घटनेतील अटक झालेल्या ग्रामस्थांची तक्रार दाखल करून घेण्याबाबत निवेदन देण्याचे ठरविण्यात आले, तर जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी सिंधुदुर्ग यांना व्यापारी असोसिएशन खारेपाटण व ग्रामस्थांच्यावतीने भेट घेऊन निवेदन देण्याचे ठरले. बैठकीला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ एकत्र आले होते.
या घटनेतील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी प्रमोद कांबळे यांचे काही दिवसांपूर्वी हातीवले येथील घटनेत रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले असतानाही त्यांच्याकडे दुसरे रिव्हॉल्व्हर आले कुठून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रफिक नाईक यांनी केली, तर संबंधित अधिकारी आपल्या अधिकाराच्या जोरावर अवैधरीत्या जप्त केलेली दारू रत्नागिरी, लांजा विभागात कमी पैशात विकून धंदा करीत असल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांच्या बैठकीत करण्यात आला. यामुळे मारहाण झालेल्या कर्मचारी प्रमोद कांबळे यांची सखोल चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. गावात यापुढे पोलिसांना कुठल्याही प्रकारचे सहकार्य ग्रामस्थ करणार नाहीत, तसेच महात्मा गांधी तंटामुक्त समितीचीदेखील निवड खारेपाटणात करण्यात येणार नसल्याचे ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Clutter closes at Kharapatan