Ratnagiri: यंदा पावसाळ्यात गारवा नाही; उकाडाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:52 IST2025-07-11T16:49:55+5:302025-07-11T16:52:38+5:30
बंगालच्या उपसागरात जून महिन्यात कमी दाबाचे पट्टे निर्माण न झाल्याने विचित्र अनुभव

संग्रहित छाया
रत्नागिरी : पावसाळ्याचा दीड महिना संपत आला तरी अजून पावसाने म्हणावा तसा जोर घेतलेला नाही. वातावरणातील बदलामुळे पावसाचा लहरीपणा वाढला आहे. जून महिन्यात बंगालच्या उपसागरात दर १० ते १२ दिवसांनी कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. यंदा ते झालेच नसल्याने पावसाचे आगमन अजूनही लांबलेलेच आहे. दरम्यान, पावसाची विश्रांती आणि वाढलेली आर्द्रता यामुळे यंदा पावसाळ्यात गारवा गायब; पण उकाडा कमालीचा वाढला आहे.
जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे चार महिने पावसाचे मानले जातात. त्यापैकी जून आणि जुलै या दोन महिन्यांत पाऊस मुसळधार पडतो. ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धापासून पावसाचे प्रमाण कमी होऊ लागते. जिल्ह्यात साधारणत: या चार महिन्यांत ३३६४ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. यापैकी जून महिन्यात ८१८ आणि जुलै महिन्यात १२४६ मिलिमीटर म्हणजे साधारणत: २००० मिलिमीटर पाऊस या दोन महिन्यांत पडतो.
यंदा जून महिन्याची आकडेवारीही पावसाने ओलांडलेली नाही. जुलै महिन्याचेही दहा दिवस संपले तरीही केवळ हलक्या सरीच पडत आहेत. ऐन पावसाळ्यात कडक ऊन पडू लागले आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू झाल्यासारखे वाटत आहे.
सध्या कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस आहे. आर्द्रता ७८ ते ८३ टक्के वाढल्याने घामाच्या धारांसह उकाड्याने हैराण केले आहे. कोकणात साधारणत: १० ते १२ जूननंतर नियमित होणारा पाऊस अगदी जुलै महिन्यापर्यंत संततधारेने अधूनमधून कोसळत असतो. मात्र, यंदा निम्मा जुलै महिना संपत आला तरीही पाऊस नियमित होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
हवामान खात्याचे अंदाजही पाऊस जुमानेसा झाला आहे. १२ रोजी जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा, तसेच १३ आणि १४ रेाजी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.