Ratnagiri: चिपळूण नगर परिषद ठरली सर्वाधिक स्वच्छ; देशपातळीवर ८७ वे तर कोकणात अव्वल मानांकन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 14:05 IST2025-07-18T14:04:19+5:302025-07-18T14:05:18+5:30
नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसादही चिपळूणचे मानांकन वाढविण्यासाठी मोलाचा ठरला

Ratnagiri: चिपळूण नगर परिषद ठरली सर्वाधिक स्वच्छ; देशपातळीवर ८७ वे तर कोकणात अव्वल मानांकन
चिपळूण : केंद्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानामध्ये देशभरातील ४,५८९ नगर पंचायती, नगर परिषदा व महानगरपालिकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये चिपळूण नगर परिषदेला ५० हजार ते ३ लाख लोकसंखेच्या वर्गवारीमध्ये देशपातळीवर ८७ वे, महाराष्ट्रात १४ वे, तर कोकण विभागात पहिले मानांकन मिळाले आहे.
चिपळूण नगर परिषदेकडे उपलब्ध असणाऱ्या साधनसामुग्रीद्वारे दररोज कचऱ्याचे १०० टक्के संकलन, वर्गीकरण तसेच ओला, सुका व घरगुती घातक कचऱ्यावर प्रक्रिया, मैला संकलन व त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया, सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता, शहर सफाई इत्यादी कामे नगर परिषदेमार्फत करण्यात येत आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत चिपळूण नगर परिषदेने नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृतीही करण्यात आली होती.
केंद्र शासनामार्फत नियुक्त त्रयस्थ संस्थेमार्फत शहराची स्वच्छतेची व कचरा प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. नागरिकांच्या स्वच्छतेबाबत प्रतिक्रिया घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार कचरामुक्त शहराचे तारांकित मानांकन म्हणून १ स्टार व हागणदारी मुक्त शहर म्हणून ओडीएफ मानांकनही नगर परिषदेला मिळाले आहे. नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसादही चिपळूणचे मानांकन वाढविण्यासाठी मोलाचा ठरला आहे.
मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, शहर समन्वयक पूजा शिंत्रे, आरोग्य विभाग कार्यालय कर्मचारी, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, तसेच सर्व मुकादम, सर्व स्वच्छतादूत तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्वच्छतादूत, शहरातील सर्व नागरिकांच्या सहभागातून चिपळूण शहराला हे मानांकन मिळाले आहे.