चिपळूण-कराड मार्ग ६० दिवस बंद; कोणत्या मार्गे वळवण्यात आली वाहतूक...जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 13:02 IST2026-03-28T13:02:00+5:302026-03-28T13:02:34+5:30
धांडे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी धोरणात्मक निर्णय

संग्रहित छाया
चिपळूण : चिपळूण-कराड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पाटण शहरातील धांडे पुलाची पुनर्बांधणी तसेच बाजारपेठेतील काँक्रीट रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शुक्रवारी २७ मार्च रात्री १२ वाजल्यापासून ६० दिवस हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालक व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार २७ मार्च रोजी रात्री १२ पासून ते २७ मे रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल लागू राहणार आहे. यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था म्हणून कराड व उंब्रज बाजूकडून चिपळूणकडे येणारी अवजड वाहतूक ही कराड-उंब्रज येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ मार्गे पाचवड फाटा-उंडाळे-कोकरुड-मलकापूर-आंबा घाट-संगमेश्वर मार्गे चिपळूणकडे वळविण्यात येणार आहे. त्याबाबतची अधिसूचना बुधवारी जारी झाली आहे. चिपळूणकडून कराड व उंब्रजकडे जाणाऱ्या अवजड वाहतूक चिपळूण -संगमेश्वर-आंबा घाट-मलकापूर-कोकरुड- उंडाळे-पाचवड फाटा-राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ मार्गे कराड व उंब्रजकडे जाणार आहे.
कराड व उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी सर्व हलकी वाहतूक ही कराड-उंब्रज येथून नवा रस्ता-गव्हाणवाडी फाटा-नेरळे गौंडमार्गे कराड-चिपळूण महामार्गावरून पुढे चिपळूणकडे जाणार आहे. तसेच चिपळूणकडून कराड व उंब्रजकडे जाणारी सर्व हलकी वाहतूक ही चिपळूण-नेरळे गौंड-गव्हाणवाडी फाटा-नवा रस्ता मार्गे कराड व उंब्रजकडे वळवण्यात येणार आहे.
धांडे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम तसेच बाजारपेठेतील काँक्रीट रस्त्याचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिक व वाहनचालकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच वाहतूक बदलाच्या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गावर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून आवश्यक ते दिशादर्शक फलकही लावण्यात आले असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.