Local Body Election: इच्छुकांची समजूत काढताना नेत्यांच्या आले नाकीनऊ, दाखवली जातायत आमिषे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 17:48 IST2025-11-15T17:46:50+5:302025-11-15T17:48:24+5:30
Local Body Election: सर्वच राजकीय पक्षांना इच्छुकांच्या बंडखोरीला सामोरे जावे लागण्याची शक्यता

Local Body Election: इच्छुकांची समजूत काढताना नेत्यांच्या आले नाकीनऊ, दाखवली जातायत आमिषे
रत्नागिरी : नगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिले असले, तरी अजून प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत. इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने कोणाला उमेदवारी द्यावी? असा प्रश्न अजूनही पक्ष नेतृत्वाला सतावत आहे. त्यामुळे इच्छुकांची समजूत काढताना नेतृत्वाच्या नाकीनऊ आले आहेत.
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. सुमारे साडेतीन वर्षे रखडलेली निवडणूक होत असल्याने इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवार आपले राजकीय भवितव्य बनवण्यासाठी आपल्यालाच कशी उमेदवारी मिळेल, यादृष्टीने आपली ताकद लावत आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. आता अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस बाकी असले, तरीही अजून राजकीय पक्षांचे उमेदवार ठरलेले नाहीत.
इच्छुक उमेदवार प्रचाराला लागले आहेत. काही राजकीय पक्षांकडून इच्छुकांना कागदपत्रे तयार करून त्यांचे उमेदवारी अर्जही भरून घेतले जात आहेत. एका प्रभागामध्ये दोन जागा असून, इच्छुक अनेक, अशी स्थिती आहे. अशा इच्छुकांची समजूत काढताना नेत्यांच्या नाकीनऊ आले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना इच्छुकांच्या बंडखोरीला सामोरे जावे लागण्याची शक्यता दिसत आहे.
इच्छुकांना आमिषे
उमेदवारी मिळणार नसलेल्या इच्छुकांना राजकीय पक्षाकडून वेगवेगळी आमिषे दाखवली जात आहेत. कोणाला धनाचे तर कोणाला स्वीकृत नगरसेवक पदाचेही आमिष दिले जात आहे. तरीही अनेक इच्छुक तयार होत नसल्याने नेेतेमंडळींच्या नेतृत्वाचा कस लागला आहे.