Ratnagiri: बेपत्ता सुखप्रीतच्या मित्रावर गुन्हा दाखल, आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा वडिलांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 13:24 IST2025-07-05T13:24:14+5:302025-07-05T13:24:37+5:30
सुखप्रीत भगवती मंदिरानजीक शिवसृष्टी येथून समुद्रात पडून बेपत्ता झाली

Ratnagiri: बेपत्ता सुखप्रीतच्या मित्रावर गुन्हा दाखल, आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा वडिलांचा आरोप
रत्नागिरी : आपल्या मुलीशी प्रेमाचे नाटक करून नंतर दुसऱ्या मुलीशी संबंध जोडणाऱ्या मित्रामुळेच माझी मुलगी सुखप्रीतने आत्महत्या केली आहे, अशी फिर्याद रत्नागिरीतील भगवती मंदिरानजीक समुद्रात पडलेल्या सुखप्रीतचे वडील प्रकाश धाडीवाल यांनी दिली आहे. या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी सुखप्रीतचा मित्र जसमिक केहर सिंग (२९, सध्या रा, फ्लॅट नंबर ५०१, लीली ए विंग, सिद्धिविनायकनगर, शिवाजीनगर, रत्नागिरी) याच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दि. २९ जून रोजी सुखप्रीत भगवती मंदिरानजीक शिवसृष्टी येथून समुद्रात पडून बेपत्ता झाली. सहा दिवसांनंतरही तिचा शोध लागलेला नाही. ती नेमकी कोण आहे, ही माहितीही पाचव्या दिवशी उघड झाली आहे. तिचे नाव सुखप्रीत प्रकाश धाडीवाल असे असून, ती नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात पिंपळगाव येथे आयडीबीआय बँकेत काम करते. ती बँकेच्या प्रशिक्षणासाठी बंगळुरू येथे गेलेली असताना तिची जसमिक केहर सिंग याच्याशी मैत्री झाली. त्याची नियुक्ती रत्नागिरीमध्ये झाली आहे. त्याला भेटण्यासाठी सुखप्रीत याआधीही रत्नागिरीत येऊन गेली आहे.
गुरुवारी सुखप्रीतचे वडील आणि भाऊ तिचा शोध घेत रत्नागिरीत आले. घटनास्थळी मिळालेल्या वस्तूंवरून ती बेपत्ता मुलगी सुखप्रीतच असल्याचे त्यांनी ओळखले. तिचा मित्र तिच्याशी प्रेमाचे केवळ नाटक करत होता आणि त्याने आता दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध जोडले आहेत. त्यामुळे तो सुखप्रीतला सतत टाळून तिचा मानसिक छळ करत होता. २९ जूनला ती रत्नागिरीत आलेली असतानाही त्याने तिला न भेटता नाशिकला परत निघून जाण्यास सांगितले. त्यामुळेच आपल्या मुलीने आत्महत्या केली असल्याची तक्रार प्रकाश धाडिवाल यांनी शहर पोलिस स्थानकात दिली आहे.
भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०८ अन्वये सुखप्रीतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचा गुन्हा शहर पोलिसांनी जसमिकवर दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत.