घराबाहेर न पडण्याचे आवाहन विनाकारण घराबाहेर पडलात तर कारवाई होणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 16:15 IST2020-04-17T16:13:47+5:302020-04-17T16:15:22+5:30
रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात रत्नागिरी पोलिसांनी कडक धोरण स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. वाहनचालकांबरोबरच सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर ...

घराबाहेर न पडण्याचे आवाहन विनाकारण घराबाहेर पडलात तर कारवाई होणारच
रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात रत्नागिरीपोलिसांनी कडक धोरण स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. वाहनचालकांबरोबरच सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना एकाच जागेवर एक तास बसून ठेवण्याची शिक्षा गुरूवारी देण्यात आली होती. तर शुक्रवारी सकाळी अवघ्या एका तासात तब्बल ४४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. चर्मालय, आयसीआयसी बँक आणि उद्यमनगर येथे ही कारवाई करण्यात आली.
थोडीशी शिथिलता मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विनाकारण लोक घराबाहेर पडू लागल्याने रत्नागिरी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळपासून कारवाई कठोरपणे सुरू केली. गुरुवारी वाहन घेऊन आणि मैदानावर वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी ९.५० ते ११ या मुदतीत उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या पथकाने अचानक कडक नाकाबंदी केली.
चर्मालय तिठा, आयसीआयसी बँक चौक, उद्यमनगर चौक परिसर या ठिकाणी अचानक नाकाबंदी करून ४४ वाहन चालकांवर कारवाई केली. तसेच विनाकारण फिरणारे वाहने जप्ती व वाहनांवर हजारो रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. रोडवर किरकोळ कारणांकरीता फिरणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन बाहेर न फिरण्याबाबत समज दिली. अशा प्रकारची मोहीम सुरुच राहणार असून वाहन जप्ती कारवाई मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे, असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. पोलीस प्रशासनाने आत्तापर्यंत जवळजवळ १०० दुचाकी जप्त केल्या आहेत. तर चारचाकी वाहनेदेखील जप्त केली आहेत. ही सर्व वाहने पोलीस कवायत मैदानावर ठेवण्यात आली असून, लॉकडाऊन संपल्यानंतरच सर्व वाहने परत दिली जाणार आहेत.