रत्नागिरीत ब्राऊन हेरॉईन जप्त; एक जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 12:30 IST2024-12-06T12:30:06+5:302024-12-06T12:30:38+5:30

रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरीत अमली पदार्थ विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शाळा, महाविद्यालयांनजीक अमली पदार्थ विक्री वाढत ...

Brown heroin seized in Ratnagiri One person in custody | रत्नागिरीत ब्राऊन हेरॉईन जप्त; एक जण ताब्यात

रत्नागिरीत ब्राऊन हेरॉईन जप्त; एक जण ताब्यात

रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरीत अमली पदार्थ विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शाळा, महाविद्यालयांनजीक अमली पदार्थ विक्री वाढत असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अमली पदार्थ व्यवहार करणाऱ्यांकडे विशेष लक्ष दिले आहे. त्याचवेळी घरफोड्यांकडेही गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. त्यासाठी केलेल्या गस्तीदरम्यान शहरानजीकच्या एमआयडीसी येथील एका आइस फॅक्टरीशेजारी १५० ब्राऊन हेरॉईन अमली पदार्थाच्या पुड्यांसह एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी (दि.४) करण्यात आली.

अरमान लियाकत धामस्कर (२६, रा. जे. के. फाईल, साईभूमीनगर, रत्नागिरी), असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सध्या जिल्ह्यात घरफोड्या व चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी गस्त घालत होते.

बुधवार, ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास हे पथक एमआयडीसीतून गस्त घालत असताना त्यांना येथील आबुबकर आइस फॅक्टरी शेजारील धामस्कर चिकन शॉप याठिकाणी संशयित एक ब्राऊन हेरॉईन घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला होता. सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास संशयित धामस्कर बुलेटवर बसून हातात एक पिशवी घेऊन संशयित हालचाली करताना दिसला. पोलिसांनी त्याची चौकशी व तपासणी केल्यावर त्याच्याकडून १५० ब्राऊन हेरॉईन अमली पदार्थाच्या पुड्या, एक दुचाकी व इतर साहित्य सापडले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला सापडलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयिताला ताब्यात घेऊन रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यावर एन. डी. पी. एस. ॲक्ट कलम ८ (क), २२ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, पोलिस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, हवालदार सुभाष भागणे, शांताराम झोरे, विनोद कदम, बाळू पालकर, विवेक रसाळ, योगेश नार्वेकर आणि योगेश शेट्ये यांनी केली.

Web Title: Brown heroin seized in Ratnagiri One person in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.