Ratnagiri: किरकोळ वादातून भाऊ, पुतण्याकडून प्रौढाचा खून; नाटे येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 14:26 IST2025-05-17T14:25:46+5:302025-05-17T14:26:30+5:30
राजापूर : किरकोळ कारणातून झालेल्या वादातून ४५ वर्षीय प्रौढाला ठार मारण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारी नाटे ठाकरेवाडी येथे घडली. ...

Ratnagiri: किरकोळ वादातून भाऊ, पुतण्याकडून प्रौढाचा खून; नाटे येथील घटना
राजापूर : किरकोळ कारणातून झालेल्या वादातून ४५ वर्षीय प्रौढाला ठार मारण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारी नाटे ठाकरेवाडी येथे घडली. स्वप्नील ठाकरे (४५, रा. नाटे ठाकरेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ आणि पुतण्यानेच हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाटे, ठाकरेवाडी येथील स्वप्नील ठाकरे हे रत्नागिरी येथे वास्तव्याला असून गुरूवार १५ मे रोजी ते आपल्या लहान मुलासह नाटे गावी आले होते. गुरूवारी रात्री त्यांनी त्यांचा मोठा भाऊ चंद्रकांत ठाकरे व पुतण्या अमोल (२८) यांच्यासमवेत मद्यप्राशन केले. यावेळी त्या तिघांमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक वादावादी झाली. त्यानंतर या रागातून शुक्रवारी दुपारी चंद्रकांत आणि अमोल या दोघांनी पुन्हा ठाकरे यांच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्याने दोघांनी ठाकरे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत ठाकरे यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच नाटे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेचा पंचनामा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत चंद्रकांत आणि त्यांचा मुलगा अमोल या दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.