Ratnagiri: केसमधून निर्दोष मुक्त करण्यासाठी दीड लाखाची लाच, सरकारी वकीलाला रंगेहात पकडले
By संदीप बांद्रे | Updated: January 10, 2025 15:33 IST2025-01-10T15:32:49+5:302025-01-10T15:33:14+5:30
एसीबीची चिपळूणात मोठी कारवाई

Ratnagiri: केसमधून निर्दोष मुक्त करण्यासाठी दीड लाखाची लाच, सरकारी वकीलाला रंगेहात पकडले
चिपळूण : घरडा कंपनीच्या केस मधून निर्दोष मुक्त करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तब्बल ५ लाखाची मागणी करून त्यातील दीड लाख रुपये स्वीकारताना खेड न्यायालयातील सरकारी वकील राजेश देवराव जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. चिपळूण येथील हॉटेल ओयासिस मध्ये गुरुवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
यासंदर्भात अँटिकरप्शन ब्युरोकडून मिळालेल्या माहितीनुसार घरडा कंपनीच्या संदर्भात एक खटला खेड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ यांच्या न्यायालयात सुरू आहे. तक्रारदार वकील पत्राद्वारे आपली बाजू मांडत आहेत. तर सरकारी अभियोक्ता म्हणून ऍड.राजेश जाधव हे सरकारपक्षाच्या वतीने काम पाहत होते.
दरम्यान २६ डिसेंम्बर २०२४ व ३ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या पडताळणी मध्ये तक्रारदार यांना राजेश जाधव यांनी साक्षीदार यांना शिकवणार नाही. तुमची केस कशी सुटेल यासाठी प्रयत्न करेन. जास्त सरतपास न करता महत्वाचे मुद्दे वगळून आरोपी कसे सुटतील यासाठी प्रयत्न करेन व केस लवकर संपवायला मदत करेन. त्यासाठी ५ लाख रुपये द्यावे लागतील अशी, मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती.
त्यापैकी पहिला हफ्ता म्हणून दीड लाख रुपये देण्याचे ठरले होते. याची माहिती अँटीकरप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी चिपळूण येथील हॉटेल ओयासिस हॉटेल परिसरात गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता सापळा रचला आणि दीड लाखाची लाच घेताना राजेश जाधव यांना रंगेहात पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई ठाणे परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक संजय गोविळकर, अप्पर पोलिस अधीक्षक गजानन राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक सुहास शिंदे, रत्नागिरी क्षेत्राचे पोलिस अधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.