Ratnagiri-Local Body Election: गुहागरात मनसेचा उद्धवसेनेला धक्का, अर्ज मागे घेतल्याने भाजपची एक जागा बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 17:28 IST2025-11-22T17:25:54+5:302025-11-22T17:28:05+5:30
जिल्ह्यातील पहिली जागा बिनविराेध

Ratnagiri-Local Body Election: गुहागरात मनसेचा उद्धवसेनेला धक्का, अर्ज मागे घेतल्याने भाजपची एक जागा बिनविरोध
गुहागर : गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मनसेशी हातमिळवणी करत युती केली हाेती. मात्र, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मनसेच्या सिद्धी राजेश शेटे यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या वैशाली सुभाष मावळणकर यांनी बिनविराेध हाेण्याचा मान पटकावला आहे.
राज्य पातळीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या हालचाली गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच उद्धवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत उद्धवसेना आणि मनसे अशा युतीची मुहूर्तमेढ राेवली. त्यानुसार गुहागर नगरपंचायतीमधील प्रभाग क्रमांक ४ आणि ५ या जागा मनसेसाठी सोडण्यात आल्या. त्यानंतर प्रभाग क्रमांक ४ मधून मनसेने काेमल दर्शन जांगळी आणि प्रभाग क्रमांक ५ मध्ये गुहागरात मनसे पक्ष उभा करणारे कै. राजेश शेटे यांच्या पत्नी सिद्धी राजेश शेटे यांना उमेदवारी देण्यात आली.
उद्धवसेना आणि मनसे अशी पहिलीच युती गुहागरात झालेली असतानाच अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी राजकीय उलाथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक ५ मधून निवडणूक रिंगणात उतरलेल्या मनसेच्या सिद्धी शेटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत उद्धवसेनेला ‘दे धक्का’ दिला आहे. त्यांच्या माघारीमुळे प्रभाग क्रमांक ५ मधील भाजपच्या वैशाली मावळणकर या बिनविराेध निवडून आल्या आहेत.
जिल्ह्यातील पहिली जागा बिनविराेध
जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतीच्या निवडणुका हाेणार आहेत. या निवडणुकीत गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या वैशाली मावळणकर बिनविराेध निवडून आल्या आहेत. जिल्ह्यातील पहिलीच जागा बिनविराेध झाली असून, वैशाली मावळणकर यांनी विजयी हाेण्याचा पहिला मान मिळविला आहे.