भास्कर जाधवांनी वाढवली उद्धव ठाकरेंची चिंता! जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल मोठे विधान, नाराज असल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:16 IST2026-01-20T17:14:24+5:302026-01-20T17:16:10+5:30
महापालिका निवडणुकीत मुंबई वगळता इतर ठिकाणी मोठा झटका बसलेल्या उद्धव ठाकरेंचे आता भास्कर जाधवांनी टेन्शन वाढवले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाधवांनी केलेल्या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

भास्कर जाधवांनी वाढवली उद्धव ठाकरेंची चिंता! जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल मोठे विधान, नाराज असल्याची चर्चा
महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्यात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच उद्धवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केलेल्या विधानाने कोकणात नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे. भास्कर जाधव जे बोलले, त्यावरून ते पक्षावर नाराज असल्याचेही अर्थ काढले जात आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत सपाटून मार खालेल्ल्या उद्धव ठाकरेंच्या चिंतेत नवी भर पडली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या निमित्ताने भास्कर जाधव यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.
भास्कर जाधवांची निवडणुकीबद्दल भूमिका काय?
उद्धवसेनेच्या १५ उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले. त्यानंतर भास्कर जाधव यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल माध्यमांशी बोलताना सांगितले की, "मला संपूर्ण जिल्ह्याचे काही सांगता येणार नाही, परंतू माझ्या मतदारसंघात तीनही पंचायत समिती शंभर टक्के मी जिंकेन."
"भाजपाकडून आतापर्यंत पक्ष फोडून झाले आहेत. मतदारयांद्यामध्ये घोळ सुरू आहेत. भरमसाठ पैशांचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा त्यांचा फंडा आहे. मात्र, त्याउलट आमच्याकडे पैसे नाहीत, प्रचंड जनशक्ती आहे. धनशक्तीसमोर आमची जनशक्ती भारी पडेल, असा विश्वास मला आहे. माझ्या मतदारसंघातील तीनही पंचायत समिती मी जिंकणार आहे", असे भास्कर जाधव म्हणाले.
भास्कर जाधव हे उद्धवसेनेचे कोकणातील एक महत्त्वाचे नेते आहेत. विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्याकडे उद्धवसेनेचे कोकणातील चेहरे म्हणून बघितले जाते.
रत्नागिरी जिल्ह्यात आता जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे. पंचायत समित्यांच्या निवडणुकाही लागल्या आहेत. अशात भास्कर जाधव यांच्याकडे उद्धवसेनेकडून जबाबदारी दिले जाईल असे बोलले जात असतानाच भास्कर जाधवांनी स्पष्ट मत मांडत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.
पक्षाकडून जिल्ह्यात महत्त्वाची जबाबदारी दिली गेली नसली, तरी भास्कर जाधव यांनी आपल्या गुहागर मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केले असल्याचे दिसत आहे.