राजापूर : परीक्षेत पास हाेणे त्याहीपेक्षा पहिलं येणे ही गाेष्ट मुलांसाठी महत्त्वाची असते. त्याचा आनंद वेगळाच असताे. मी जेव्हा सातवीच्या परीक्षेत पास झालो होतो, त्यावेळी साखर वाटायलाही माझ्या आईकडे पैसे नव्हते. तिने खाडीत जाऊन कालव बोचून ती विकून साखर आणली होती आणि वाटली होती, अशी आठवण ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांनी सांगितली.दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्याचे नाटककार गंगाराम गवाणकर यांनी जाहीर केले आहे. याबाबत बाेलताना त्यांनी सांगितले की, तालुक्यात दोन विद्यार्थी प्रथम आल्याने त्यांना बक्षिसाची रक्कम विभागून न देता दाेघांना प्रत्येकी पाच-पाच हजार, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, शालांत परीक्षेचा हा जीवनातील महत्त्वाच्या परीक्षांपैकी पहिला टप्पा असतो त्या परीक्षेमध्ये पास होणे आणि त्याहीपेक्षा प्रथम येणे म्हणजे मुलांसाठी महत्त्वाची गोष्ट असते. माझे स्वतःचे शिक्षण रात्रीच्या हायस्कूलमधून झाले आहे. शालांत परीक्षेच्या या टप्प्यावर पास होणे आणि त्याचा आनंद काय असतो याची आठवण आज ही मला येते, असे ते म्हणाले.मी सातवीच्या परीक्षेत पास झालो होतो. त्यावेळी आईने खाडीत जाऊन कालव बोचून तिने ती विकून साखर आणली होती आणि वाटली होती. बोर्डाच्या म्हणजे तत्कालीन अकरावीच्या परीक्षेत पास झालो होतो. तेव्हा आता ज्या पद्धतीने आनंद साजरा केला जातो, तसा आमच्या नशिबात नव्हता. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे छोटसं बक्षीस देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अथर्व माेरे, आदिती वायबसे बक्षिसाचे मानकरीपाचल येथील सरस्वती विद्यामंदिरचा अथर्व मोरे व कारवली येथील अर्जुना माध्यमिक विद्यालयाची आदिती वायबसे यांनी ९८.६० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. हे दाेघे गंगाराम गवाणकर यांनी जाहीर केलेल्या बक्षिसाला पात्र ठरले आहेत.