पॉस मशीनचा वापर केला नाही, रत्नागिरीतील ६ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित; कृषी विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 14:16 IST2025-10-11T14:15:07+5:302025-10-11T14:16:12+5:30
विक्रेत्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याची सक्त ताकीदही देण्यात आली

पॉस मशीनचा वापर केला नाही, रत्नागिरीतील ६ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित; कृषी विभागाची कारवाई
रत्नागिरी : रासायनिक खतांची विक्री पॉइंट ऑफ सेल (पॉस) मशीनद्वारे न केल्याने आणि खत नियंत्रण आदेश १९८५ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे विक्री परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत. परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी ही कारवाई सप्टेंबर अखेर केली आहे. तसेच पाच विक्रेत्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याची सक्त ताकीदही देण्यात आली आहे.
खत विक्रेत्यांना रासायनिक खतांची विक्री ही पॉस मशीनद्वारे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ चे पालन हाेते की नाही याची तपासणी कृषी विभागाकडून करण्यात आली. या तपासणीमध्ये काही विक्रेते या नियमांचे पालन करत नसल्याचे आढळले. त्यामुळे कृषी विभागाकडून खत विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये चिपळूण तालुक्यातील पाच व रत्नागिरी तालुक्यातील एक मिळून सहा विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच चिपळूण तालुक्यातील चार व दापोली तालुक्यातील एक मिळून पाच विक्रेत्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे.
खत विक्रेत्यांनी रासायनिक खतांची विक्री पॉस मशीनद्वारेच करणे आवश्यक आहे. तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ मधील नियमाचे पालन करणेही अनिवार्य आहे. शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची खते, बी-बियाणे वेळेवर उपलब्ध करून द्यावीत. विक्री व्यवस्थेतील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे. - शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, रत्नागिरी.