Local Body Election: प्रशासकीय तयारी पूर्ण, रत्नागिरी जिल्ह्यात २०० मतदान केंद्र सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 18:12 IST2025-12-01T18:10:59+5:302025-12-01T18:12:31+5:30
जिल्ह्यात सात ठिकाणी निवडणुका

Local Body Election: प्रशासकीय तयारी पूर्ण, रत्नागिरी जिल्ह्यात २०० मतदान केंद्र सज्ज
रत्नागिरी : जिल्ह्यातील सात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर राेजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २०० मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. या केंद्रांवर निवडणूक निर्णय अधिकारी १ ते ३ यांच्यासह एकूण १२०० अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
राज्यात नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठीचा पहिला टप्पा उमेदवार निश्चिती हा पार पडला असून, येत्या २ डिसेंबर रोजी यासाठी दुसरा टप्पा म्हणजे मतदान होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या चार नगरपरिषदा आणि गुहागर, देवरूख आणि लांजा या तीन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. सात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगराध्यक्षपदासाठी आणि १५१ नगरसेवकांच्या जागेसाठी या निवडणुका होणार आहेत. मतदानाची ही प्रक्रिया संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात पार पडणार आहे.
या प्रक्रियेची सज्जता प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या सात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी २०० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. सर्वाधिक केंद्रे रत्नागिरीत आहेत. या प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक १ ते ३, तसेच पोलिस कर्मचारी आणि शिपाई असे प्रत्येकी २०० मिळून एकूण १००० अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्रावर कार्यरत राहणार आहेत.
२०० मतदान केंद्रांसाठी एकूण कंट्रोल युनिट २२१ (राखीव १० टक्क्यांसह) आणि मतदान यंत्रे ४४१ (राखीव यंत्रांसह) सज्ज ठेवण्यात आली आहेत. या यंत्रांची उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यासमोर तपासणी झाली आहे. मतदानापूर्वीही या सर्वांच्या उपस्थितीत पडताळणी केली जाणार आहे.
न.प./न.पं. मतदान केंद्रे अधिकारी व कर्मचारी (एकूण)
नगर परिषद
रत्नागिरी - ६९ - ४१४
चिपळूण - ४८ - २८८
खेड - २० - १२०
राजापूर - १० - ६०
नगरपंचायत
लांजा - १९ - ११४
देवरूख - १७ - १०२
गुहागर - १७ - १०२
एकूण - २०० - १२००