Ratnagiri Crime: वृद्धेच्या खून प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 14:57 IST2025-05-26T14:56:44+5:302025-05-26T14:57:38+5:30
कडवई येथील खून प्रकरण, दाेघांवर पाेलिसांची नजर

Ratnagiri Crime: वृद्धेच्या खून प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई मोहल्ला येथील बानू फकीर महंमद जुवळे (वय ७०) या वृद्धेच्या खून प्रकरणातील आराेपीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पुढे आले आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्याला अटक केलेली नाही, तसेच अन्य एक महिला वयाेवृद्ध असल्याने न्यायालयीन प्रक्रियेनंतर तिला अटक करण्यात येणार आहे.
हुमायू शकील काझी (रा. फणसवणे, ता. संगमेश्वर) असे विष प्राशन केलेल्या आराेपीचे नाव आहे. बानू फकीर महंमद जुवळे या महिलेला हाजिरा मुसा माखजनकर (रा. कडवई, ता. संगमेश्वर) हिने बाहेर जाण्याचे सांगून तुरळ येथे आणले हाेते. त्यानंतर, कडवई येथील अट्टल गुन्हेगार रिझवान जुवळे आणि त्याचा साथीदार हुमायू काझी यांच्या ताब्यात दिले. त्यांनी बानू जुवळे या महिलेचा खून करून तिच्या अंगावरील दागिने चोरले आणि तिचा मृतदेह कुंभारखाणी येथील जंगलात फेकून दिला हाेता.
नातेवाइकांनी बेपत्ता म्हणून फिर्याद देताच, संगमेश्वर पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे यांनी या प्रकरणाचा तपास करत खुनाचा छडा लावला. या खूनप्रकरणी मुख्य संशयित आराेपी रिझवान महामुद जुवळे (रा. कडवई, ता. संगमेश्वर) याला अटक केली आहे.
मात्र, महिला आरोपी हाजिरा माखजनकर ही ज्येष्ठ नागरिक असल्याने न्यायालयीन बाबी पूर्ण करून तिला अटक केली जाणार आहे, तसेच हुमायू काझी याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने ताे रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याची प्रकृती सुधारताच त्यालाही अटक केली जाईल, असे पाेलिसांनी सांगितले.
साेनाराकडून दागिने हस्तगत
वृद्धेच्या अंगावरील दागिने चाेरून ते एका साेनाराला विकल्याची माहिती रिझवान जुवळे याने पाेलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी त्या साेनाराकडून ३०.४५० ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले आहेत.