होय! ‘ती’ बेपत्ता तरुणी माझी सुखप्रीत आहे!, हरयाणाहून आलेल्या पित्याला अश्रू झाले अनावर; शोध सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:43 IST2025-07-04T15:43:37+5:302025-07-04T15:43:59+5:30
रत्नागिरीतील तरुणाकडून सुखप्रीतचा मानसिक छळ?

होय! ‘ती’ बेपत्ता तरुणी माझी सुखप्रीत आहे!, हरयाणाहून आलेल्या पित्याला अश्रू झाले अनावर; शोध सुरुच
रत्नागिरी : येथील भगवती किल्ल्यानजीक डोंगरावरून समुद्रात पडून बेपत्ता झालेल्या तरुणीचा शोध पाचव्या दिवशीही लागलेला नाही. दरम्यान, ती नाशिकहून आलेली हरयाणाची तरुणी असल्याच्या मुद्द्यावर बहुतांश शिक्कामोर्तब झाले आहे. घटनास्थळी आढळलेली चप्पल आणि ओढणी आपल्या मुलीची म्हणजे सुखप्रीतची असल्याचे, तिच्या शोधासाठी हरयाणाहून आलेल्या प्रकाशसिंह धारिवाल यांनी पोलिसांना सांगितले आहे.
रविवारी (दि. २९) दुपारी एक तरुणी भगवती किल्ल्यानजीकच्या पाणभुयार स्पॉटच्या डोंगरावरून २०० ते २५० फूट खाली समुद्रात पडली. तेव्हापासून ती बेपत्ता आहे. पहिल्या दोन दिवसांत जिल्ह्यात कोठेही तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार न आल्याने पोलिसांसमोर गूढ निर्माण झाले होते.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथील पोलिस स्थानकात आयडीबीआय बँकेत काम करणारी तरुणी बेपत्ता झाली असल्याची तक्रार देण्यात आली हाेती. ही मुलगी हरयाणाची असून, तिचे वडील नाशिकमध्ये आले होते.
हा एक धागा मिळाल्यानंतर त्यांना रत्नागिरीमध्ये बोलावण्यात आले. गुरुवारी सकाळी ते रत्नागिरीत आले. पोलिसांनी त्यांना घटनास्थळी सापडलेली चप्पल आणि ओढणी दाखवली. या वस्तू आपली मुलगी सुखप्रीतच्या असल्याचे त्यांनी ओळखले. आपल्या मुलीने भावनिक फसवणूक किंवा मानसिक छळातून टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
रत्नागिरीतील तरुणाकडून सुखप्रीतचा मानसिक छळ?
सुखप्रीतला रत्नागिरीतील बँकेत काम करणारा तरुण मानसिक त्रास देत होता. हा तरुण तिच्याशी प्रेमाचे नाटक करत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे तिने हे पाऊल उचलले असावे, असा संशयही प्रकाशसिंह धारिवाल यांनी व्यक्त केला आहे.