लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून दिव्यांग तरुणाने संपविले जीवन, संगमेश्वरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 17:56 IST2025-10-27T17:56:05+5:302025-10-27T17:56:24+5:30
देवरुख : दारूचे व्यसन आणि शारीरिक दिव्यांगत्वामुळे लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून एका ३२ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास ...

लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून दिव्यांग तरुणाने संपविले जीवन, संगमेश्वरातील घटना
देवरुख : दारूचे व्यसन आणि शारीरिक दिव्यांगत्वामुळे लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून एका ३२ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. ही घटना संगमेश्वर तालुक्यातील वांद्री कुणबीवाडी येथे शनिवारी (दि. २५) घडली आहे.
मकरंद कृष्णा पाल्ये असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने संगमेश्वर पाेलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मकरंद पाल्ये याला दारूचे व्यसन होते, तसेच त्याचा एक पाय दुसऱ्या पायापेक्षा लहान होता. या दिव्यांगत्वामुळे त्याचे लग्न ठरत नव्हते, या गोष्टीचे त्याला प्रचंड नैराश्य आले होते. या नैराश्येतूनच त्याने शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १:३० वाजण्याच्या दरम्यान आत्महत्या केली.
त्याने राहत्या घराच्या खोलीतील लोखंडी चॅनलला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला. ही बाब त्याच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात येताच, त्यांनी संगमेश्वर पाेलिसांना याबाबत माहिती दिली. पाेलिसांनी घटनास्थळी दाखल हाेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. याबाबत संगमेश्वर पोलिस स्थानकात भारतीय न्यायसंहिता अधिनियम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.