रत्नागिरी : समुद्रकिनाऱ्यावर मित्रांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा रीतीने गाडी चालवणाऱ्या नाशिकमधील तरुणाला पाेलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भूषण गजानन भेलेकर (वय २०, रा. मालेगाव, नाशिक) असे तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस काॅन्स्टेबल संग्राम झांबरे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनारी घडली.बुधवारी सायंकाळी चालक भूषण भेलेकर हा कार (एमएच ४० सीएक्स ८२६२) गाडीतून मित्रांसोबत भाट्ये समुद्रकिनारी गेला होता. तो गाडी घेऊन समुद्रकिनारी सुसाट वेगाने गाडी चालवीत असताना त्याची गाडी वाळूमध्ये रुतली. ही बाब तेथील नागरिकांनी भाट्ये तपासणी नाक्यावरील अंमलदार संग्राम झांबरे यांना कळवली.त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिल्यावर त्यांना गाडी वाळू व पाण्यामध्ये चालवल्यामुळे रुतलेली दिसली. याप्रकरणी चालक भूषणने गाडीतील मित्रांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, हे माहीत असूनही हयगयीने व अविचाराने गाडी चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरीत समुद्रकिनारी कारचा थरार नाशिकमधील तरुणाच्या अंगाशी, गाडी वाळूमध्ये रुतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:43 IST