गणपतीपुळे समुद्रात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू, दोघांना वाचविण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 15:36 IST2025-11-17T15:36:09+5:302025-11-17T15:36:40+5:30
पोलिसांच्या गस्तीत वाढ

गणपतीपुळे समुद्रात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू, दोघांना वाचविण्यात यश
गणपतीपुळे : समुद्राच्या पाण्यात आंघोळीचा आनंद लुटताना पाण्याचा अंदाज न आल्याने मुंबईतील तीन तरुण बुडाल्याची घटना शनिवारी (१५ नाेव्हेंबर) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमाराला गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे घडली. यातील दाेघांना वाचविण्यात यश आले असून, एकाचा बुडून मृत्यू झाला. अमाेल गाेविंद ठाकरे (वय २५, रा. भिवंडी, मुंबई) असे या तरुणाचे नाव असून, पर्यटक निवासासमोरील समुद्रकिनारी रविवारी पहाटे ताे सापडला.
भिवंडी येथून सहा मित्र गणपतीपुळे येथे देवदर्शन आणि पर्यटनासाठी शनिवारी आले हाेते. त्यापैकी अमाेल ठाकरे, विकास विजयपाल शर्मा (वय २४), मंदार दीपक पाटील (वय २४) हे तिघे समुद्राच्या पाण्यात आंघोळीसाठी गेले हाेते. तिघांनीही समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही बुडू लागले.
हा प्रकार त्यांच्यासोबत किनाऱ्यावर असलेल्या अन्य मित्रांनी पाहिला आणि त्यांनी आरडाओरडा करून मदत मागितली. मोरया वॉटर स्पोर्टच्या जेटस्की बोटीवरील व्यावसायिकांनी तत्काळ धाव घेत मदत केली. यातील दोघांना पाण्याबाहेर काढण्यात त्यांना यश आले. मात्र, अमाेल ठाकरे हा पाण्यात बेपत्ता झाला.
पाण्यातून बाहेर काढलेल्या तातडीने विकास विजयपाल शर्मा आणि मंदार पाटील या दोघांना संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्या रुग्णवाहिकेने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी बुडालेल्या अमाेल ठाकरे याचा रात्रभर समुद्राच्या पाण्यात शाेध सुरु हाेता. पर्यटक निवासासमोरील समुद्रकिनारी भागात रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ताे बेशुद्धावस्थेत सापडला. त्याला तातडीने वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले हाेते. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची कदम यांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून मृत घोषित केले. त्यानंतर उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
पाेलिसांच्या गस्तीत वाढ
गणपतीपुळे येथे शनिवार, रविवारी पर्यटकांची माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत आहे. मात्र, यातील अतिउत्साही पर्यटक समुद्रस्नानाचा आनंद लुटण्यासाठी समुद्रात जात आहेत. मात्र, पाण्याचा अंदाज येत नसल्याने पर्यटक बुडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर याठिकाणी पाेलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.