Ratnagiri Crime: वडिलांच्या गळ्यावर सुरी ठेवली, आईकडे खंडणी मागितली; अपहरण दरम्यान गुगल पे वापले अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 16:27 IST2025-10-15T16:26:05+5:302025-10-15T16:27:14+5:30
पोलिसांच्या तत्काळ हालचालींमुळे संशयित मुलगा काही तासांत सापडला

Ratnagiri Crime: वडिलांच्या गळ्यावर सुरी ठेवली, आईकडे खंडणी मागितली; अपहरण दरम्यान गुगल पे वापले अन्..
देवरूख : आपल्या ८० वर्षांच्या जन्मदात्याच्या गळ्यावर सुरी ठेवून त्याने आईकडे खंडणी मागितली आणि त्या पैशांसाठी वडिलांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांचे हातपाय बांधून तो फोटो आईला व्हॉट्सॲपवर पाठवला. घाबरलेल्या आईने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आधुनिक साधनांच्या साहाय्याने त्याचा माग काढला आणि त्याला दुपारी चिपळूणमध्ये ताब्यात घेण्यात आले. श्रीकांत दत्तात्रय मराठे (४५) असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. हा प्रकार देवरूखमध्ये घडला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत मराठे पुण्यामध्ये राहतो. सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी तो देवरुखला आला. देवरुखातील चोरपऱ्या भागामध्ये त्याचे आईवडील राहतात. त्याचे वडील दत्तात्रय मराठे (८०) सेवानिवृत्त शिक्षक आहेत. श्रीकांत त्यांच्याकडे सातत्याने पैशांची मागणी करत असे. सोमवारी घरी आल्यानंतरही यावरून त्याचा वाद झाला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास या वादाने टोक गाठले. आईच्या समोरच त्याने आपल्या वडिलांच्या मानेवर सुरा ठेवला आणि आता एक लाख रुपये द्या नाहीतर यांना ठार मारतो, अशी धमकी दिली. त्यामुळे घरातील सर्वजण घाबरले. श्रीकांतने वडिलांना जबरदस्तीने कपडे घातले आणि त्यांना दुचाकीवर बसवून तो घरातून बाहेर पडला.
पहाटेपर्यंत त्याच्याशी किंवा त्याच्या वडिलांशी काहीच संपर्क न झाल्याने कुटुंब चिंतेत असतानाच सकाळी श्रीकांतने आपल्या वडिलांच्या मोबाइलवरून व्हॉट्सॲपवर कॉल केला. त्या मोबाईलवरुन त्याने वडिलांचा हात-पाय आणि तोंड प्लास्टिक टेपने घट्ट बांधलेला फोटो पाठवला होता. श्रीकांतने त्या फोटोसोबत एक लाख रुपये खंडणी मागितली आणि नकार दिल्यास आता मी मागे हटणार नाही, अशी धमकीही दिली.
एवढा प्रकार झाल्यानंतर मात्र श्रीकांतची आई सुनीता मराठे यांनी धाडस दाखवत देवरूख पोलिस स्थानक गाठले आणि श्रीकांतविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ आपली सुत्रे हलवली आणि दुपारी साडेतीनच्या सुमारास श्रीकांतला चिपळूण पोलिसांच्या मदतीने चिपळूणमध्ये ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत श्रीकांतच्या अटकेची प्रक्रिया सुरू होती.
अपहरण करून रत्नागिरीत
वडिलांचे अपहरण केल्यानंतर श्रीकांत याने रत्नागिरी गाठली आणि तेथे एका लॉजवर तो राहिला. तेथेच त्याने वडिलांचे हात-पाय व तोंड बांधलेला फोटो काढला असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
तक्रारीची कुणकुण लागली
आपल्याविरोधात तक्रार दिली जात असल्याची कुणकण श्रीकांतला रत्नागिरीतील लॉजवर असतानाच लागली. त्यामुळे लॉज सोडून देत तो वडिलांना घेऊन एस. टी. बसने चिपळूणकडे निघाला. मात्र तोपर्यंत सावध झालेल्या पोलिसांनी त्याचा माग काढला आणि चिपळूणमध्ये त्याला ताब्यात घेतले.
जी पे वापरल्याने सापडला
या एकूणच अपहरण नाट्यादरम्यान श्रीकांतने जी पेचा वापर करून पैसे दिले होते. त्याआधारावरून देवरूख पोलिसांनी श्रीकांतचा माग काढला. त्यातूनच तो चिपळूणकडे जात असल्याचे पुढे आले आणि देवरूख पोलिसांनी चिपळूण पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि श्रीकांतला ताब्यात घेण्यात आले.
या प्रकाराची देवरूख पोलिस स्थानकात तक्रार त्याच्या आईने सुनिता दत्तात्रय मराठे (वय ७४) यांनी दाखल केली. त्यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला आहे.
या घटनेनंतर आई सुनिता मराठे यांनी धाडस दाखवत थेट देवरूख पोलिस स्थानक गाठले आणि मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्पर कारवाई करत चिपळूण परिसरातून श्रीकांत मराठेला ताब्यात घेतले. सध्या देवरूख पोलिस पुढील तपास करत असून, श्रीकांतवर खंडणी, अपहरण आणि जीवे मारण्याच्या धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अधिक तपास देवरूख पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर करीत आहेत.