रत्नागिरीच्या खासगी आरामबसला भीषण आग, प्रवासी बालंबाल बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 03:55 PM2024-02-08T15:55:58+5:302024-02-08T15:57:17+5:30

बस जळून खाक सुदैवाने जीवितहानी नाही 

A private bus caught fire in Ratnagiri due to sudden tire burst, Passengers survived | रत्नागिरीच्या खासगी आरामबसला भीषण आग, प्रवासी बालंबाल बचावले

रत्नागिरीच्या खासगी आरामबसला भीषण आग, प्रवासी बालंबाल बचावले

रत्नागिरी / महाड : प्रवासादरम्यान अचानक टायर फुटून रत्नागिरीतल एका खासगी आरामबसला आग लागली. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्रीनंतर अडीच वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर महाड एमआयडीसीनजीक सावित्री पुलानजीक घडला. बराचवेळ आग पेटतच राहिल्याने बसचे खूप नुकसान झाले. बसमधील २३ जण बालंबाल बचावले.

रत्नागिरी येथील हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मालकीची औदुंबर छाया ट्रॅव्हल्स ही कंपनी असून, या कंपनीने गौरव चव्हाण यांच्या मालकीची भाडेतत्त्वावर घेतलेली प्रवासी बस (एमएच ०८-ई-९७७९) बुधवार ७ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीहून मुंबईकडे निघाली होती. ती मध्यरात्री उशिरा २:३० वाजण्याच्या दरम्यान महाडच्या सावित्री पुलाजवळ आली. अचानक तिच्या उजव्या बाजूचा मागील टायर फुटून त्याने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या डाव्या बाजूस उभी करून प्रवाशांना झटपट खाली उतरवले.

बसमधील अग्निशमन यंत्रणेमार्फत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु आगीचा जोर जास्त असल्याने संपूर्ण बसने पेट घेतला आणि बघता बघता बस जाळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच काही वेळातच महाड एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या बसमध्ये १९ प्रवासी आणि चालकासह ट्रॅव्हल कंपनीचे ४ असे एकूण २३ जण प्रवास करीत होते. प्रवाशांना वेळीच खाली उतरवल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र या आगीमध्ये बस संपूर्णपणे जळून खाक झाली.

दरम्यान या बसमधील सर्व प्रवाशांना अन्य एका बसमधून मुंबई येथे रवाना करण्यात आले. या संपूर्ण घटनेची माहिती बसचे चालक गुलहसन पठाण यांनी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांमार्फत अधिक तपास सुरू आहे. समृद्धी महामार्गावर टायर फुटून होणाऱ्या अपघातांच्या घटनांचे उदाहरण समोर असताना आता मुंबई गोवा महामार्गाचेदेखील काँक्रिटीकरण झाल्यामुळे येणाऱ्या कालावधीत अशा पद्धतीने टायर फुटीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी शासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत या दुर्घटनेनंतर नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: A private bus caught fire in Ratnagiri due to sudden tire burst, Passengers survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.