लाईफ जॅकेट असूनही बुडाला; गणपतीपुळेत बोटीवरून पडून कोल्हापुरातील पर्यटकाचा मृत्यू झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 13:55 IST2025-04-25T13:54:34+5:302025-04-25T13:55:27+5:30
कुटुंबाच्या डाेळ्यांसमाेरच मृत्यू

संग्रहित छाया
गणपतीपुळे : ड्रॅगन बाेटीवरून सफारी करताना समुद्रातील माेठ्या लाटेने दिलेल्या धडकेत हात सुटून समुद्रात पडलेल्या काेल्हापुरातील प्राैढाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे घडली. सुरेश जेटानंद गेवराणी (४९, रा. ताराबाई पार्क, कापसेमाळ, काेल्हापूर) असे त्यांचे नाव आहे.
सुरेश जेटानंद गेवराणी व त्यांचे कुटुंब गणपतीपुळे येथे गुरुवारी दुपारी पर्यटनासाठी व देवदर्शनासाठी आले होते. त्यांनी गणपतीपुळे समुद्रात आंघोळीचा आनंद घेत हाेते. त्याचवेळी ड्रॅगन बोटीचा आनंद घेण्यासाठी ते समुद्रात गेले असता, ड्रॅगन बोटीला समुद्राच्या एका मोठ्या लाटेने धडक दिली. त्यामुळे त्यांचा हात सुटला आणि ते समुद्रात पडले. त्यांनी सुरक्षिततेसाठी जॅकेट घातले होते. परंतु, तरीही ते पाण्यात बुडू लागल्याचे कळताच बोट व्यावसायिक आणि समुद्र बाहेर असलेल्या जीवरक्षकांनी त्यांना तात्काळ पाण्याबाहेर काढले.
त्यानंतर संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्या रुग्णवाहिकेने त्यांना मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी मधुरा जाधव यांनी प्राथमिक तपासणी केली असता, त्यांना मृत घोषित केले. मालगुंड येथे शवविच्छेदनाची सुविधा नसल्याने त्यांचे शव जाकादेवी येथे पाठवण्यात आले हाेते. या घटनेचा अधिक तपास जयगड पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस करीत आहेत.
कुटुंबाच्या डाेळ्यांसमाेरच मृत्यू
सुरेश गेवराणी यांच्यासोबत त्यांची पत्नी, सासू, मुलगा व मुलगी फिरण्यासाठी आले होते. मात्र, त्यांच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दु:खाचा डाेंगर काेसळला. कुटुंबीयांनी डाेळ्यांदेखत सुरेश गेवराणी यांचा मृत्यू पाहिला. त्यामुळे कुटुंबीयांना माेठा धक्का बसला.
लाईफ जॅकेट असूनही बुडाले
सुरेश गेवराणी यांनी बाेटीतून सफर करताना सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट घातले हाेते. मात्र, ते बाेटीवरून समुद्रात पडले आणि बुडाले. लाईफ जॅकेट असूनही ते कसे बुडाले, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.