Ratnagiri: खडपोलीत पती-पत्नीच्या वादातून हाणामारीपर्यंत जुंपली; पाच जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:29 IST2025-12-17T13:28:03+5:302025-12-17T13:29:30+5:30
चिपळूण : पती-पत्नीच्या किरकोळ वादातून मारहाणीचा प्रकार खडपोली ब्राम्हणवाडी येथे सोमवारी सायंकाळी ५ वाजता घडला. पत्नीला पतीसह त्याच्या नातेवाइकांनी ...

संग्रहित छाया
चिपळूण : पती-पत्नीच्या किरकोळ वादातून मारहाणीचा प्रकार खडपोली ब्राम्हणवाडी येथे सोमवारी सायंकाळी ५ वाजता घडला. पत्नीला पतीसह त्याच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण केल्याने येथील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात फिर्यादी महिलेला दुखापत झाली आहे.
वैभव पांडुरंग तांबट, विनोद पांडुरंग तांबट, विशाखा विनोद तांबट, रोहिणी रवींद्र पंडव ( सर्व रा. खडपोली ब्राह्मणवाडी ) व श्रद्धा गणेश गांजेकर (रा. कादवड, चिपळूण ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
यातील फिर्यादी महिला व वैभव पांडुरंग तांबट यांचे १८ वर्षांपूर्वी लग्न झाले असून, त्यांच्यामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरु आहे. फिर्यादी यांनी घटस्फोट मिळण्यासाठी साडेतीन वर्षांपूर्वी खेड न्यायालयात दावा दाखल केला होता. फिर्यादी या आशा सेविका असून त्यांची बचत गटाची बैठक सोमवारी खडपोली ब्राह्मणवाडी येथे होती. फिर्यादी या बैठकीसाठी गेलेल्या असताना त्यांच्या समोरून एक रिक्षा गेली. त्या रिक्षात वैभव तांबट व त्याच्यासोबत एक महिला होती. त्यांना पाहून फिर्यादीने त्या रिक्षाच्या पाठीमागून गेल्याने तेथे फिर्यादी व वैभव तांबट यांच्यात वाद झाला.
त्यानंतर वैभवने शिवीगाळ, दमदाटी करुन फिर्यादी महिलेला हाताने मारहाण करुन ढकलून दिले. त्यानंतर जवळच असलेल्या विनोद तांबट यांना बोलाविले. विनोद तांबट याने हातातील काठीने फिर्यादी महिलेला मारले आणि शिवीगाळ केली. तसेच विशाखा तांबट, रोहिणी पंडव व श्रद्धा गांजेकर यांनीही फिर्यादीला मारहाण केली, अशी नोंद पोलिस तक्रारीत करण्यात आली आहे.
याप्रकरणी या पाचही जणांवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १८९ (२), १९०, ११५ (२), ११८ (२), ३५१ (२) व ३५२ नुसार अलोर- शिरगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.