Ratnagiri: गणपतीसाठी लागणाऱ्या साहित्यासह अन्य साहित्य घेऊन निघाले, आगीत जळून खाक झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:42 IST2025-08-25T17:41:51+5:302025-08-25T17:42:17+5:30
साहित्याचे जळलेले अवशेष पाहून मात्र अनेकांच्या डाेळ्यांत अश्रू दाटले

Ratnagiri: गणपतीसाठी लागणाऱ्या साहित्यासह अन्य साहित्य घेऊन निघाले, आगीत जळून खाक झाले
हर्षल शिरोडकर
खेड : गणपतीसाठी लागणाऱ्या साहित्यासह अन्य साहित्य घेऊन मुंबईतून मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील काेकणवासीय खासगी आराम बसने निघाले हाेते. मात्र, काेकणच्या हद्दीत येण्यापूर्वीच कशेडी घाटात आराम बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. रविवारी सकाळी आग शांत झाल्यानंतर काहींनी आगीत काही साहित्य वाचले का, हे पाहण्याचा प्रयत्न केला. पण, काेणाच्याच हाती काही लागले नाही. साहित्याचे जळलेले अवशेष पाहून मात्र अनेकांच्या डाेळ्यांत अश्रू दाटले हाेते.
कोकणात गणेशोत्सव म्हटलं की, मुंबईत नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले गणेशभक्त आपापल्या गावी मिळेल त्या वाहनाने उत्सव साजरा करण्यासाठी येत असतात. मुंबईतून गावी येताना गणेशोत्सवात सजावट करण्यासाठी लागणारे साहित्य, नातलगांसाठी नवीन कपडे, प्रसाद, विजेची तोरणे यासह विविध साहित्य साेबत घेऊन येतात.
कुटुंबासहित प्रवास करणाऱ्या या मुंबईकरांनी उत्सवामुळे मौल्यवान दागिने, रोख रक्कम व इतर वस्तूही सोबत घेतलेल्या असतात. मालवणकडे निघालेल्या मुंबईकरांनीही आपल्यासाेबत उत्सवासाठी माेठ्या प्रमाणात साहित्य घेतले हाेते. बसच्या मागील डिकीत प्रवाशांनी बॅगा ठेवलेल्या हाेत्या. मात्र, शनिवारी मध्यरात्री बसला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण साहित्य जळून गेले.
रविवारी सकाळी ही आग शांत झाल्यानंतर काही प्रवाशांनी बसमध्ये आगीतून काही साहित्य वाचले आहे का, याचा शाेध घेतला. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. जळलेल्या साहित्यांचे अवशेष पाहिल्यानंतर त्यांचे अश्रू दाटून आले आणि गहिवरलेल्या अवस्थेत ते खाली उतरले.
आनंदावर विरजण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः पाच दिवस गणेशाची आराधना करणाऱ्या कुटुंबात सर्वसाधारणपणे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने कुटुंबातील स्त्रिया विविध प्रकारचे दागदागिने परिधान करतात. मुंबईतून आपल्या गावी येणारे कुटुंब आपले वर्षानुवर्षे केलेल्या कष्टाने मिळवलेले मौल्यवान दागिने सोबत घेऊन येतात. मात्र, हे माैल्यवान साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले.