Ratnagiri News: पत्रकार अपघातप्रकरणी चालकावर खुनाचा गुन्हा, संशयाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 18:32 IST2023-02-09T18:31:07+5:302023-02-09T18:32:10+5:30
वारिशे यांच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण

Ratnagiri News: पत्रकार अपघातप्रकरणी चालकावर खुनाचा गुन्हा, संशयाचे वातावरण
राजापूर : पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी अटकेत असलेले महिंद्रा थारचे चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी या अपघातप्रकरणी आंबेरकर याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०८ व सदोष मनुष्यवधाचा कायदा कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यात कलम ३०२ ही जोडण्यात आले आहे.
राजापूर शहराजवळच्या कोदवली येथील पेट्रोलपंपाजवळ सोमवारी दुपारी हा अपघात झाला होता. त्यामध्ये पत्रकार शशिकांत वारिशे गंभीर जखमी झाले होते. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले होते. वारिशे यांचे मेहुणे अरविंद दामोदर नागले यानी राजापूर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार राजापूर पोलिसांनी थार गाडीचा चालक पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन अटक केली होती. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
दरम्यान, वारिशे यांच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे अपघातास कारणीभूत ठरलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरुद्धच्या कलमांमध्ये बुधवारी कलम ३०२ वाढविण्यात आले आहे.