Ratnagiri: हातखंबा येथे उलटलेली कार रस्त्यातच पेटली, सुदैवाने मुलीसह वडील बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 15:43 IST2025-09-29T15:41:15+5:302025-09-29T15:43:09+5:30
वाहतूक काही काळ ठप्प

Ratnagiri: हातखंबा येथे उलटलेली कार रस्त्यातच पेटली, सुदैवाने मुलीसह वडील बचावले
रत्नागिरी : डाेळ्यासमाेर आलेला कीटक बाजूला करताना वळणाच्या ठिकाणी ब्रेक मारताच रस्त्यावरील खडीवरून घसरून कार उलटून पेटली. या अपघातात लहान मुलीसह वडील बालंबाल बचावले. हा अपघात रविवारी दुपारी मुंबई-गाेवा महामार्गावरील हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे झाला. देवगडहून रत्नागिरीकडे येताना हा अपघात झाला.
डॉ. मिहीर मुरलीधर प्रभुदेसाई (वय ४०, रा. काेलगाव, सावंतवाडी, सिंधुदुर्ग) हे कार (एमएच ०७, क्यू ८०३२) घेऊन देवगडहून रत्नागिरीच्या दिशेने येत हाेते. यावेळी त्यांच्यासमवेत दहा वर्षांची मुलगी श्रीशा हाेती. डाॅ. प्रभुदेसाई यांनी गाडीची काच खाली केली हाेती. ही गाडी महामार्गावरील हातखंबा पाेलिस तपासणी नाक्यापुढे आली असता चालकाच्या डाेळ्यासमाेर कीटक आला. त्याला बाजूला करतानाच अचानक समाेर वळण आले. त्यामुळे चालकाने ब्रेक मारला, त्याचवेळी महामार्गाच्या कामामुळे रस्त्यावर पसरलेल्या खडीवरून कार घसरली.
त्यानंतर समाेरच्या दुभाजकावर जाऊन कार आदळली आणि उलटली. गाडी रस्त्यावर उलटताच डाॅ. प्रभुदेसाई मुलीसह तत्काळ गाडीबाहेर आले त्यामुळे अनर्थ टळला. त्यानंतर काही क्षणातच गाडीने पेट घेतला. स्थानिक ग्रामस्थ व रस्त्यावरील अन्य वाहनचालकांनी त्यांना मदत केली.
या अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरीतील अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गाडीला लागलेली आग आटाेक्यात आणली. मात्र, ताेपर्यंत गाडी पूर्णत: जळून खाक झाली.
वाहतूक काही काळ ठप्प
अपघातग्रस्त गाडीने पेट घेतल्याने वाहतूक पाेलिसांनी दाेन्ही बाजूची वाहतूक काही काळ थांबवली हाेती. त्यामुळे दाेन्ही बाजूला गाड्यांच्या रांगा लागलेल्या हाेत्या. आग आटाेक्यात आल्यानंतर ही वाहतूक पूर्ववत करण्यात आली.