वादळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील ११ गावांतील ४,३७६ ग्राहक अंधारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 17:42 IST2025-05-24T17:42:07+5:302025-05-24T17:42:32+5:30
खेड, मंडणगड, दापोलीत वीज सुरळीत

वादळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील ११ गावांतील ४,३७६ ग्राहक अंधारात
रत्नागिरी : गेले चार दिवस जिल्ह्याला मान्सूनपूर्व वादळी पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वारे, मुसळधार पावसामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडली आहे. जिल्ह्यातील १,१५३ गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. पैकी ११४२ गावातील वीजपुरवठा पूर्ववत झाला असून, अद्याप ११ गावांतील ४,३७६ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही.
जिल्ह्यातील १८ उपकेंद्रे बाधित झाली होती. मात्र, सर्व उपकेंद्रे पूर्ववत करण्यास यश आले आहे. उच्चदाब १०३ वाहिन्या बंद पडल्या होत्या त्यापैकी १०१ वाहिन्यांवरील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. दाेन वाहिन्या मात्र अद्याप बंद आहेत. लघुदाब वाहिनीचे एकूण ११६ वीजखांब पडले होते, त्यापैकी ५७ खांब उभे करण्यात आले आहेत. तसेच उच्चदाब वाहिनीचे ६१ खांब पडले होते, त्यापैकी २२ खांब उभे केले आहेत. एकूण ५५७५ रोहित्रे ठप्प झाली होती.
त्यापैकी ५,५२२ रोहित्रांवरील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. एकूण बाधित ११५३ गावांपैकी ११४२ गावांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून, ३,३६,०९३ ग्राहकांपैकी ३,३१,७१७ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे ३९ लाखांंचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. वीजपुरवठा लवकर सुरू करण्याकरिता महावितरणचे कर्मचारी व अधिकारी परिश्रम घेत आहेत.
खेड, मंडणगड, दापोलीत वीज सुरळीत
मंडणगड तालुक्यातील ३३ केव्ही केरील वाहिनीवर तुळशी गावात वीज पडल्यामुळे वाहिनी बंद पडली होती. एकूण ४३ इन्सुलिटर्स बदलावे लागले. तुळशी गाव, देव्हारे, बाणकोट या परिसरातील जंगलातून ही वाहिनी येत असल्यामुळे कर्मचारी, अधिकारी यांनी अथक परिश्रमाने वाहिनीवरील वीज पुरवठा सुरळीत केला.