रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात २३ हजार बोगस मतदार, उद्धवसेनेचे उपनेते बाळ माने यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 16:08 IST2025-10-04T16:08:07+5:302025-10-04T16:08:39+5:30
पदाधिकारीच घरभेदी निघाले

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात २३ हजार बोगस मतदार, उद्धवसेनेचे उपनेते बाळ माने यांचा आरोप
रत्नागिरी : मागील निवडणुकीत रत्नागिरीविधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये २३ हजार बोगस मतदार असल्याचा आराेप उद्धवसेनेचे उपनेते व माजी आमदार बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या बाेगस मतदारांवर कोणताही कंट्रोल नव्हता. निवडणुकीपूर्वी रत्नागिरीच्या प्रांताधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केलेली आहे; मात्र ही बाेगस नावे वगळण्यात आलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचाेरीचा मुद्दा मांडला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात बोगस मतदानाचे षडयंत्र रचले गेल्याचे बाळ माने यांनी सांगितले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील बाेगस मतदारांबाबत केलेल्या तक्रारीबाबत प्रांताधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितले होते की, त्या-त्या केंद्रात याद्या लावून मतदार केंद्रातील अधिकाऱ्यांना जे कोणी बोगस मतदान करण्यासाठी येतील त्यांना रोखले जाईल, असा शब्द दिला होता; मात्र हे माझ्या मताप्रमाणे सर्व खोटं होते, असाही आरोप माने यांनी केला.
मतमाेजणीवेळी मतदार केंद्रावर आपला कोणीही प्रतिनिधी नव्हता. त्यामुळे त्याचा गैरफायदा घेत अनेक मतदान केंद्रांवर बोगस मतदान झालेले आहे. मतदान केंद्रांवर आमचा प्रतिनिधी का नव्हता, याबाबत निवडणूक विभागच कदाचित सांगू शकतो; परंतु मतदार यादीत बोगस मतदारच नसते तर पुढचा प्रश्नच उद्भवला नसता, असेही ते म्हणाले. निवडणूक आयाेगाने मतदार याद्यांची तपासणी करून बाेगस मतदारांची नावे कमी करावीत आणि ताेपर्यंत पुढील निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणीही त्यांनी केली.
पदाधिकारीच घरभेदी निघाले
आमच्याच पक्षाचे त्यावेळचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच काही विभागप्रमुख बेईमान झाले हाेते. पदाधिकारीच घरभेदी झाले हाेते. मात्र, मी उमेदवार असल्याने मला त्याकडे लक्ष देणे शक्य नव्हते; मात्र नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. जे काेणी नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती व सदस्य, जिल्हा परिषद सदस्य होणार आहेत त्यांच्यासाठी हा धोक्याचा सिग्नल आहे, असेही बाळ माने यांनी सांगितले.