गुहागरातील बाेऱ्या समुद्रकिनारी सापडले २१ किलो चरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 14:24 IST2023-08-23T14:23:46+5:302023-08-23T14:24:13+5:30
गुहागर ( रत्नागिरी ) : दापाेली तालुक्यातील किनाऱ्यावर माेठ्या प्रमाणात चरसची पाकिटे सापडलेली असतानाच आता गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी ...

गुहागरातील बाेऱ्या समुद्रकिनारी सापडले २१ किलो चरस
गुहागर (रत्नागिरी) : दापाेली तालुक्यातील किनाऱ्यावर माेठ्या प्रमाणात चरसची पाकिटे सापडलेली असतानाच आता गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी सीमा शुल्क विभागाला २ बेवारस गोणी सापडल्या आहेत. त्यामध्ये चरसाची १८ पाकिटे असून, त्यांचे वजन २१ किलो ८५ ग्रॅम इतके आहे. हा साठा १९ ऑगस्ट राेजी हाती लागला.
दापोली तालुक्यातील कर्दे ते लाडघरदरम्यान समुद्रकिनाऱ्यावर १४ ऑगस्ट राेजी बेवारस स्थितीत १० पाकिटे पाेलिसांना मिळाली हाेती. ही पाकिटे जप्त करून माहिती घेतली असता त्यामध्ये ११.८८ किलो अफगाणी चरस आढळला हाेता. त्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दापोलीतील विविध समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालण्यास सुरुवात केली.
त्यानंतर १५ ऑगस्टला ३४.९१ किलो, १६ ऑगस्टला केळशी समुद्रकिनाऱ्यावर २७.९९ किलो, कोळथरे येथील समुद्रकिनाऱ्यावर १३.०४ किलो, १७ ऑगस्टला मुरूड (ता. दापोली) येथील समुद्रकिनाऱ्यावर १४.४१ किलो, तर त्याच दिवशी बुरोंडी ते दाभोळ किनाऱ्यादरम्यान तब्बल १००.९५ किलो चरस सापडले.
दापाेली तालुक्यात माेठ्या प्रमाणात चरस सापडले असतानाच गुहागरातही चरसची पाकिटे सापडली आहेत. तालुक्यातील बाेऱ्या समुद्रकिनारी सीमा शुल्क विभागाला १९ ऑगस्टला २१.८५ किलो चरस जप्त केले आहे.
सीमा शुल्क विभागाचे बोऱ्या क्षेत्राचे अधीक्षक जयकुमार म्हणाले की, रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यावर एकूण १७ गोणी सापडल्या आहेत. त्यामध्ये निळ्या रंगाची पाकिटे होती. बोऱ्या येथे २ गोणी आढळल्या. त्यामध्ये १८ निळ्या रंगाची पाकिटे होती. आजपर्यंत दापोली आणि गुहागर तालुक्यातील ७ समुद्रकिनाऱ्यांवरून २२२.०३ किलो चरस जप्त करण्यात आले आहे. सीमा शुल्क विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घातली जात आहे, असे त्यांनी सांगितले.